
Export of grapes : सध्या भारतातून युरोपियन युनियन (EU) कडे होणाऱ्या द्राक्ष (Table Grapes) निर्यातीला मोठा फटका बसलेला आहे. मागील आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार, या हंगामात निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्यावर आली आहे. ही आकडेवारी २०१४-१५ नंतरची सर्वात कमी आहे, असे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विश्लेषक अॅडम फॉर्मिका यांनी सांगितले आहे.
या घसरणीमागे शेतातील हवामान बदल आणि बाजारातील काही कारणे आहेत. हंगामाच्या सुरुवातीस अनपेक्षित पावसामुळे द्राक्ष उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांची घट झाली. यामुळे निर्यातीसाठी पुरेसा दर्जेदार माल उपलब्ध झाला नाही. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यात भारतीय बाजारपेठेत द्राक्षांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. देशांतर्गत भाव इतके वाढले की, अनेक शेतकऱ्यांनी माल परदेशात न पाठवता भारतातच विकणे पसंत केले.
यावर्षी बांगलादेश आणि इतर आशियाई देशांकडूनही द्राक्षांसाठी चांगली मागणी आली, त्यामुळे निर्यातयोग्य द्राक्षांचा मोठा हिस्सा या बाजारातच खपला गेला.
ही परिस्थिती पाहता, दक्षिण आफ्रिका, पेरू आणि चिली सारख्या देशांतील उत्पादकांना भविष्यात युरोपात स्पर्धा कमी भासण्याची शक्यता आहे. तसेच, आशियाई देशांनी अधिक प्रमाणात द्राक्ष खरेदी केल्यास, युरोप व अमेरिकेकडे जाणाऱ्या अतिरिक्त फळांचा भार कमी होऊ शकतो.
शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती संमिश्र आहे. एकीकडे देशांतर्गत बाजारात चांगले भाव मिळाले, पण निर्यात घटल्यामुळे निर्यातदार व मोठ्या उत्पादकांसमोर अडचणी उभ्या राहू शकतात. त्यामुळे हवामानाच्या बदलांचा सामना करत, भविष्यातील उत्पादन नियोजन आणि बाजाराचे विश्लेषण गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी आता देशांतर्गत आणि आशियाई बाजारांच्या मागणीचा अभ्यास करून उत्पादन आणि विक्री नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते, असे जाणकारांनी सुचविले आहे.