Water management : शेतीचा आधार सिंचन; आता जलव्यवस्थापनावर राज्याचा भर..

water management

water management : शेतीसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक असून, प्रभावी सिंचन व्यवस्थेमुळे उत्पादनक्षमता आणि शाश्वत शेतीस चालना मिळते. यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यभर ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी, जलसाक्षरतेसाठी आणि पाणी बचतीविषयी जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या पंधरवड्याच्या माध्यमातून जल व्यवस्थापनाच्या सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित करून शाश्वत उपाययोजना प्रत्यक्षात आणल्या जाणार आहेत. नागरिकांनी, शासकीय यंत्रणांनी, स्थानिक संस्था आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

पंधरवड्याची सुरुवात १५ एप्रिल रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ च्या औपचारिक शुभारंभाने होणार आहे. १६ एप्रिल रोजी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वयन करण्यात येईल. १७ एप्रिलला स्वच्छ कार्यालय अभियान व जल पुनर्भरण कार्य, १८ एप्रिल रोजी शेतकरी व पाणी वापर संस्था यांच्याशी संवाद साधला जाईल.

१९ आणि २० एप्रिल रोजी भूसंपादनातील अडचणींचे निराकरण, कालवा पाहणी व स्वच्छता अभियान राबवले जाणार आहेत. २१ ते २४ एप्रिल दरम्यान सिंचन परवाने, अनधिकृत वापर तपासणी, पीक पद्धती सुधारणा, सिंचन ई-प्रणाली, पाणी दर व वसुली यावर लक्ष दिले जाईल.

२५ एप्रिलला विद्यापीठे, केव्हीके व सेवाभावी संस्थांबरोबर संवाद साधला जाईल. २६ एप्रिलला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणी वापराचे परीक्षण व सांडपाणी व्यवस्थापन, २७ एप्रिलला आपत्ती व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन, २८ एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाने जमिनींसंदर्भातील नोंदी घेण्याचे कार्य केले जाईल.

२९ एप्रिलला पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी चर्चासत्र होणार असून, ३० एप्रिल रोजी जिल्हा मुख्यालयी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला मेळावा, कार्यशाळा आणि पंधरवड्याचा समारोप तसेच नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या अभियंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सिंचन व्यवस्था सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी, पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी जलसंपत्ती जपण्यासाठी हा पंधरवडा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.