‘Shetkari Bhavan’: ‘शेतकरी भवन’ योजना राज्यात वेगाने राबवली जाणार…

‘Shetkari Bhavan’: राज्यातील नांदेड, जालना, कोल्हापूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्याने शेतकरी भवन उभारण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील बिलोली, जालना जिल्ह्यातील वडीगोद्री, कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव आणि गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील बाजार समित्यांचा समावेश आहे.

या शेतकरी भवनांकरिता अंदाजे खर्च पुढीलप्रमाणे आहे, बिलोली येथे 1.52 कोटी, वडीगोद्री येथे 1.52 कोटी, वडगाव येथे 1.50 कोटी आणि सिरोंचा येथे सर्वाधिक 2.36 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाने प्रत्येक ठिकाणी अंदाजपत्रकाच्या 50% ते 70% इतके अनुदान मंजूर केले असून उर्वरित निधी स्थानिक बाजार समितींकडून स्वनिधी किंवा कर्ज मार्गे उभारण्यात येणार असल्याचे या संदर्भातील शासकीय आदेशात म्हटले आहे.

ही सर्व कामे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना’ अंतर्गत करण्यात येणार आहेत. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना बाजार समितीत येताना थांबण्यासाठी जागा, बसण्यासाठी आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, तसेच सल्ला व माहिती केंद्र यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना 2023 मध्ये शासनाने घोषित केली असून त्याअंतर्गत अनेक ठिकाणी नव्या शेतकरी भवनांसाठी प्रस्ताव आले आहेत.

या भवनांमुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. अनेक वेळा विक्रीसाठी लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना तासन्‌तास रांगेत थांबावे लागते, त्यांना आता विश्रांतीची जागा उपलब्ध होणार आहे. शिवाय माहिती केंद्रांमुळे बाजारभाव, शासकीय योजना, तांत्रिक सल्ला याबाबत थेट मदत मिळू शकणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये शेतकरी सन्मानाने आणि सुलभतेने व्यवहार करू शकतील.