महाराष्ट्र शासनाने देशी गायींना राज्यमाता-गोमाता घोषीत करण्याचा घेतला निर्णय ..

देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये ‘राज्यमाता-गोमाता’ महाराष्ट्रातील देशी गायींना घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली . चर्चे मध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला व यासंदर्भातला जीआर जारी करण्यात आला आहे. शासन आदेशामध्ये यासंदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे .

‘प्राचीन काळापासून गायीचे अनन्यसाधारण महत्त्व मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये आहे. गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व वैदिक काळापासून विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे म्हटले जाते . राज्यातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, तर विदर्भात गवळाऊ). तथापि दिवसेंदिवस देशी गाईची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत चालली आहे ’, अशी चिंता या आदेशाच्या सुरुवातीलाच व्यक्त करण्यात आली आहे.

मानवी आहारात देशी गायीच्या दुधाचे पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. मानवी शरीर पोषणासाठी देशी गायींच्या दुधात महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्यामुळे ते पूर्णअन्न असते . देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे’, असं यात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *