
maharashtra weather update: फिंजल चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी घालवल्यानंतर, पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी (झंजावात)प्रकोप व समुद्र सपाटी पासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्चं तपाम्बरातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांचे झोता(जेट स्ट्रीम)मुळे आजपासून खान्देश, नाशिकपासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यन्त थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते.
विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार दि. १० डिसेंबर नंतर जाणवेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
विदर्भातही आज तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
मात्र मंगळवार दि. १० डिसेंबरनंतर तेथेही वातावरण निवळेल.
पुढील दिवसात कसे असेल तपमान
या दिवसातील पहाटे ५ चे किमान व दुपारी ३ चे कमाल अशी दोन्हीही तापमाने घसरून, सरासरी इतकी म्हणजे, भागपरत्वे किमान १० ते १२ तर कमाल २८ ते ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता जाणवते.
थंडीसाठी, सध्याचे १० दिवस सुरक्षित जाणवतात. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन ह्यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा व ह्या १० दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा, असे वाटते.
कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून, थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे.
शिवाय पूर्व प्रशांत महासागरात ‘ ला-निना अजूनही अवतरलेला नाही. त्यामुळे थंडीच्या लाटांचाही कमी राहील, असे वाटते.