गरीबाची गाय म्हणून शेळीला ओळखले जाते. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वात जास्त काळजी ही गोठ्यातील आद्रता नियंत्रित राखण्यासाठी घ्यावी लागते . जास्त आद्रता शेळ्यांना सहन होत नाही. त्यामुळे त्यांना श्वसनसंस्थेचे आजार होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यामध्ये आद्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते. यामुळे व्यवस्थापनात त्यानुसार बदल करणे गरजेचे असते. पावसाळ्यात शेळीचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.खाद्य, प्रजनन तसेच गाभण शेळी व करडांची निगा लसीकरण या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन करावे.
घ्यावयाची काळजी
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेळ्यांना जंतनाशकाच्या मात्रा देणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा जंताची अंडी आणि गोचीड यांच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असतो. शेळ्यांच्या शरीरातील गोचीड रक्त शोषण घेतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. त्यांच्या अंगावर खाज सुटते. अशावेळी शेळ्या बेचैन होतात. त्यांची हालचाल मंदावते, त्यासाठी शेळ्यांच्या अंगावर गोचीड नाशक औषध लावणे गरजेचे असते.
पावसाळ्यामध्ये गोठ्यातील आद्रता वाढते. शेळ्या उष्णता सहन करू शकतात, मात्र आद्रता सहन करू शकत नाही. गोठ्यातील आद्रता कमी ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी शेगडी किंवा ६० वॉटचा बल्ब लावून उष्णता निर्माण करावी. गोठ्यातील जमीन दररोज स्वच्छ करावी व कोरडी ठेवावी. पडत्या पावसामध्ये शेळ्यांना बाहेर चरायला सोडू नये. पावसात भिजल्यामुळे शेळ्यांना न्यूमोनियासारखा आजार होण्याची शक्यता असते. यामुळे शेळ्या शिंकतात, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते इ. अशी लक्षणे दिसून येतात.
गोठ्यातील जमीन ओली राहिल्यामुळे शेळ्यांच्या पाया च्या खुरामध्ये ओलसरपणा राहून पायाला फोड येतात. त्यामुळे शेळ्या लंगडतात, चारा कमी खातात आणि अशक्त होतात. अशावेळी लगेच उपचार न केल्यास शेळ्या दगावण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात उगवलेला कोवळा हिरवेगार गवत शेळ्या अधिक प्रमाणात खाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे . अशा चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात. त्यामुळे अपचन पोट फुगणे, हगवण असा त्रास उद्भविण्याची शक्यता असते.
लसीकरण महत्त्वाचे
पावसाळ्यामध्ये शेळ्यांना प्रामुख्याने विविध जिवाणू विषाणू आणि परजीवी कृमी यांच्यामुळे विविध आजार होतात . बदलते हवामान आणि खाद्यतील पोषकत्वांच्या अभावामुळे विशेषता करडे लवकर आजारास बळी पडतात. पावसाळ्यामध्ये करडांची खाद्य पाणी आणि आरोग्याची योग्य निगा राखणे आवश्यक असते.
शेळ्या व करडांना आंत्रविषार, फुफ्फुसदाह, लाळ्या खुरकूत, घटसर्प व फऱ्या या आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. पावसाळ्यामध्ये शेळ्यांना धनुर्वात होण्याची जास्त शक्यता असते.त्यासाठी धनुर्वार्ताचे इंजेक्शन पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून द्यावे.
गाभण शेळीची पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी कारण पावसाळ्यात गोठ्याची जमीन ओलसर राहिल्यामुळे चालताना घसरून पडून गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यासाठी गाभण शेळ्यांचे स्वतंत्र योग्य निवाऱ्याखाली आणि कोरड्या ठिकाणी व्यवस्थापन करावे.