महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० लाख विमा अर्ज द्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला होता.
खरीप २०२४ हंगामात पेरण्या सुरु झाल्या आहेत. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून हि योजना राबविण्यात येत आहे. विमा योजनेत शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी सरकारने पिक विमा पोर्टल सुरु केले आहे . एक रुपया भरून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा घ्यावा, असे आवाहन केले आहे .
योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण बाबी..
• विमा योजनेत समाविष्ट पिके भात (धान), नाचणी (रागी), खरीप ज्वारी, बाजरी,मका, तूर, मुग, भुईमुग, तीळ, कारळे, उडीद, सोयाबीन, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी,यामध्ये अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल.
• शेतकर्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये करावी.
• या योजनेमध्ये अधिसूचित क्षेत्रामध्ये , अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत.
• नोंदणीकृत भाडे करार भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे .
• आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मस्जिद अकृषक जमीन, यांची जमीन वर विमा काढल्यास त्याची अत्यंत गंभीरपणे दखल घेतली जाईल.
•बिगर कर्जदार व पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील.
• शेतात जर विमा घेतलेले पीक नसल्यास आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे आपण जे पीक शेतात लावले आहे त्याच पिकाचा विमा या योजनेत घ्यावा.
• अर्ज करण्यासाठी आधार नंबर गरजेचा आहे.
• आधार वरील नावाप्रमाणेच पिक विम्यातील अर्ज हा असावा.
• बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्ड वरील नाव सारखे असावे.
• आधार संलग्न बँक खात्यामध्ये केंद्र शासनाच्या विमा पोर्टल द्वारे पिक विम्यातील नुकसान भरपाई ही करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे गरजेचे आहे. यासाठी आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो.
• केंद्र शासनाने विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये ४० मानधन ठरवून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी द्वारे सीएससी विभागास दिले जाते . तसेच शेतकऱ्यांनी सीएससी चालकांना प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे पैसे द्यावेत.
विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे
• पिकांच्या उत्पादनामध्ये पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत येणारी घट
• हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान.
• पिक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान.
• स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान.
• काढणी पश्चात पिकाचे नुकसान.
शेतकऱ्याने विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी काय करावे?
• या विमा योजनेत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस सहभाग बंधनकारक नाही.
• मात्र त्यासाठी विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी शेतकर्याने किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे याबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.
• दि. १५ जुलै २०२४ हि या योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत आहे.
• सर्वसाधारण पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम, यामध्ये जिल्हानिहाय फरक संभवतो.
• इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, आधार कार्ड ,बँक पासबुक,व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.inया पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.