Bhujbal: नुकसात मंत्रिमंडळ विस्तार झालेले महायुती सरकारसमोर मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदारांनी आणि माजी मंत्र्यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या चारच दिवसात राज्य सरकारमधील घटक पक्षांपुढे अडचणी उभ्या ठाकल्याचे बोलले जातेय.
समजा युतीतील इतर घटक पक्षांच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि सरकार अल्पमतात आले, तर दुसरा पर्याय काय याची भाजपापुढे सुरवातीला काळजी नव्हती, पण आता त्यांच्याच पक्षातील सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री नाराज असल्याच्या चर्चा असून भविष्यात या ही पक्षातून एक गट फुटून सरकार अडचणीत येणारच नाही याची सध्या तरी शाश्वती नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ नाराज झाले आहे. अधिवेशन सोडून ते नाशिकला परतल्यावर त्यांच्या समर्थनांनी निदर्शने केली असून त्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. विशेष म्हणजे मी कोणाच्या हातातील खेळणे नाही अशी उघड टिकाही छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यातून त्यांचे बंडखोरीचे संकेत राजकारणात मिळत असल्याचे राजकीय कार्यकर्ते सांगतात. मात्र त्याबाबत सध्या तरी काही भाष्य करणे घाईचे ठरणार असले, तरी एका गोष्टीमुळे सामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ती गोष्ट किंवा ती घटना म्हणजे आमदार बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला झालेली भेट. या भेटीचा वृत्तांत अजूनही समजलेला नसला, तरी भविष्यात भाजपा सरकारला धोका झाला, तर हे दोन्ही पक्ष जवळ येऊ शकतात, अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अर्थात त्याबाबतचा तपशील लवकरच समोर येईल, पण तूर्तास हे दोन्ही नेते एकमेकांना पुन्हा भेटणे हा नक्कीच योगायोग नसावा असे जाणकारांचे निरीक्षण आहे.