कांद्याला मार्च महिन्यामध्ये खूप कमी भाव मिळाला होता. परंतु मागील दहा दिवसापासून थोडा चांगला भाव कांद्याला मिळू लागलेला आहे. शेतकऱ्याचा कांदा खराब झाल्यामुळे आवक जवळपास साठ टक्के घटली आहे. त्यामुळे कांद्याचा तुटवडा जाणवू लागल्याने कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा झालेली दिसून येत आहे.
दुसरीकडे सरकारने आता नाफेडने साठवलेला कांदा बाजारात आणण्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान नाफेड ने एक पत्र काढून 15 सप्टेंबर नंतर कांदा बाजारात विकण्या बाबत निर्णय होणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उन्हाळ कांद्याला जेमतेम दर..
डिसेंबर – जानेवारी मध्ये लागवड केलेला उन्हाळा कांदा विक्रीसाठी मार्चच्या सुमारास बाजारात येतो कांद्याला मागील चार महिने केवळ 700 ते 800 रुपये दर मिळाला. त्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या पावसाने कांदा जास्त दिवस टिकणार नाही . अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यामुळे गोदामातील जवळपास 40% कांदा खराब झाला असून काही शेतकऱ्यांचा संपूर्ण कांदा खराब झाला आहे . त्यामुळे कांद्याचे आवक मध्ये घट झाली आहे. आता सरकार कांद्याचे भाव रोखण्यासाठी नाफेडने साठवलेला कांदा बाजारात आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नाफेड चा कांदा दरवर्षी ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये बाजारात येत असतो. यंदा आवक घटत असल्यामुळे दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता दिसू लागली.
टोमॅटोची आयात आणि भाव कोसळले,
गेले काही दिवस टोमॅटोला चांगला भाव मिळत असताना सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करून देशांतर्गत बाजारात भाव कमी केले . यंदा नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास आपल्या कांद्याला भाव कमी मिळण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
सध्या असे आहेत कांदा दर
दरम्यान 13 ऑगस्ट 2023 रोजी पिंपळगाव बसवंत बाजारपेठेमध्ये कांद्याला किमान 400 ते कमाल 2900 रुपये दर मिळाला सरासरी 2350 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. विंचूर बाजार समितीत किमान 1000 ते कमाल २५१३ व सरासरी 2150 रुपये इतके प्रतिक्विंटल दर तसेच लालसगाव बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 800 ते कमाल 2390 सरासरी 2150 दर मिळाला.
महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून प्राप्त झालेले बाजार समिती मधील दर पुढील प्रमाणे
बाजार समिती | आवक (क्विंटलमध्ये) | किमान दर | कमाल दर | सरासरी |
---|---|---|---|---|
14/08/2023 | ||||
पुणे -पिंपरी | 21 | 700 | 2300 | 1500 |
पुणे-मोशी | 417 | 500 | 2000 | 1250 |
13/08/2023 | ||||
राहूरी | 33416 | 200 | 2800 | 1500 |
खेड-चाकण | 200 | 1000 | 2500 | 1800 |
मंचर | 9564 | 1500 | 3250 | 2375 |
सातारा | 230 | 1000 | 2400 | 1700 |
राहता | 12018 | 700 | 3300 | 2000 |
जुन्नर – नारायणगाव | 12 | 500 | 3000 | 2000 |
जुन्नर -आळेफाटा | 11300 | 1500 | 3210 | 2200 |
अकलुज | 330 | 1000 | 3500 | 2500 |
पुणे | 9609 | 1000 | 2700 | 1850 |
पुणे- खडकी | 37 | 1100 | 1600 | 1350 |
पुणे -पिंपरी | 30 | 700 | 2500 | 1600 |
पुणे-मांजरी | 123 | 1600 | 2200 | 1800 |
पुणे-मोशी | 455 | 1000 | 2000 | 1500 |
कर्जत (नगर) | 65 | 300 | 2200 | 1300 |
पैठण | 2357 | 700 | 3200 | 1900 |
कोपरगाव | 8460 | 350 | 2350 | 2080 |
पारनेर | 23976 | 300 | 3100 | 1850 |
भुसावळ | 11 | 900 | 1200 | 1000 |
वैजापूर- शिऊर | 2569 | 300 | 3000 | 2100 |
रामटेक | 20 | 1400 | 1600 | 1500 |
…तर संपूर्ण राज्यात रस्ता रोको आंदोलन दिघोळे
दहा-बारा दिवसापासून कांद्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली . या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता नाफेडचा बफर स्टॉक मधील कांदा बाजारात आणून कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. सरकारने देशातील ग्राहकांना हा कांदा रेशनिंग द्वारे वाटावा. केंद्र सरकारने हा कांदा बाजारात आणल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.
गेल्या आठवडेभरामध्ये कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली ,तरी सर्वसाधारण भाव कमीच आहेत. बाजारामध्ये चांगल्या कांद्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे 800 ते 2300 रुपयांचा भाव असला तरी कांद्याला सरासरी भाव हा कमीच असून पुढील काळात बाजार वर खाली राहण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव बाजार समिती
सहा महिने कमी भावात विकत असलेल्या कांद्याला येत्या दहा दिवसापासून भाव मिळू लागला आहे. मात्र सरकार जर नाफेडचा कांदा बाजारात आणणार असेल तर ते चुकीचे आहे . सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून कांदा बाजारात आणू नये.
– गोकुळ गिते, संचालक, पिंपळगाव बाजार समिती