Nanded Cotton : नांदेड कापूस संशोधन केंद्राचा राष्ट्रीय पातळीवर गौरव..

Nanded Cotton

Nanded Cotton : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने राष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान मिळवला आहे. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) – कापूस अंतर्गत या केंद्राला ‘सर्वोत्कृष्ट एआयसीआरपी केंद्र’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नागपूर येथील अखिल भारतीय कापूस संशोधन संस्था (ICAR-CICR) तर्फे उत्कृष्टता प्रमाणपत्र देऊन या गौरवशाली केंद्राच्या योगदानाची दखल घेण्यात आली.

२०१८ ते २०२३ या कालावधीत केंद्राने कापूस संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली. पंचवार्षिक पुनरावलोकन समितीने (QRT) या कालावधीतील संशोधन मूल्यांकन करून या पुरस्कारासाठी शिफारस केली होती. उच्च दर्जाचे संशोधन, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांसाठी प्रभावी कार्यप्रणाली यामुळे नांदेड केंद्र देशपातळीवर चमकले आहे.

नांदेड येथील हे केंद्र महाराष्ट्रातील महत्त्वाचे कापूस संशोधन हब म्हणून ओळखले जाते. या केंद्राने कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या कापूस वाणांचा विकास केला असून, कीड व रोगप्रतिकारक वाणांच्या संशोधनातही आघाडी घेतली आहे. मराठवाड्यातील कोरडवाहू व सिंचित भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रयोगशील संशोधन उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केंद्राच्या माध्यमातून होत आहे.

दरम्यान या सन्मानाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केंद्रातील सर्व अधिकारी, संशोधक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे हे यश शक्य झाले. संपूर्ण विद्यापीठ परिवार, संशोधक, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांचे योगदान यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.

या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे कापूस संशोधन आणि उत्पादन क्षेत्रात अधिक नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी नांदेड केंद्राला नवी प्रेरणा मिळाली आहे. शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त आणि लाभदायक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने हे केंद्र सातत्याने पुढे जात राहील. या गौरवामुळे संपूर्ण विद्यापीठात आनंदाचे वातावरण असून, शास्त्रज्ञ, संशोधक आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी या केंद्राचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply