
onion damage : नाशिकच्या कळवणसह चांदवड आणि सिन्नर तालुक्यात गव्हावर वापरले जाणारे तणनाशक फवारल्याने १००हून अधिक एकरवरील कांदा भुईसपाट झाला. असेच प्रकरण देवळा तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडले होते. कृषी सेवा केंद्राने कंपन्यांच्या लिंकींगच्या दबावातून औषध शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले असा आरोप होताना दिसत आहे. मात्र या संदर्भात राज्याच्या कृषी मंत्र्यांनी कृषी निविष्ठा पुरवठादारांच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे.
बि-बियाणे, खते आणि कीटकनाशक यांची गुणवत्ता तपासणी, केंद्र व राज्यांच्या विविध नियम व धोरणात एकसूत्रता आणण्यात येत असून खत उत्पादक आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्या व विक्रेते यांनी खते आणि औषधे याबाबतीत कोणत्याही प्रकारचे लिंकींंग करू नये. रेसिड्यू फ्री आणि ट्रेसेबिलिटीची सुविधा असलेला शेतीमाल शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी कंपन्या आणि विक्रेत्यांना दिल्या आहेत.
कृषिमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, बि-बियाणे, खते आणि कीटकनाशक यांची गुणवत्ता तपासणी करताना गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांच्या कामामध्ये अधिक पारदर्शकता आणली जाईल. राज्यात बि-बियाणे,खते आणि कीटकनाशक यांच्याबाबतीत असलेल्या नियमांमध्ये पुनरावृत्ती टाळणे, समान नमुना पद्धतीने तपासणीचे धोरण, संगणीकृत बियाणे साठा पुस्तक ठेवणे, बियाणे नमुनाचे आकारमानात बदल, एक देश एक परवाना या सर्व सूचनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येईल.
कंपन्यांनी फक्त नफा हा दृष्टीकोन समोर ठेवून न काम करता शासनाने दिलेल्या नियंमाचे पालन करणेही गरजेचे आहे. बि-बियाणे, खते आणि कीटकनाशक यांच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जिथे नियमांत त्रुटी असेल जिथे कायद्याचे उल्लंघन केले जाईल तिथे कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही कृषी मंत्र्यांनी दिला आहे.
जागतिक बाजारात आता रेसिड्यू फ्री म्हणजेच कीडनाशकाच्या उर्वरित अंशाची कमाल पातळी सांभाळून पिकवला जाणारा शेतीमाल विकला जातो. हा शेतीमाल ट्रेसेबल असतो. ट्रेसेबल म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यातील खरी माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देणारी प्रणाली होय. सध्या रेसिड्यू फ्री आणि ट्रेसेबिलिटीची सुविधा असलेला शेतीमाल शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या. कीटकनाशक कंपनीने बाजारात विकले जाणारे औषधे अजून कमी किमतीत उपलब्ध होतील का याबाबतीत विचार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.