
मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शेल कंपन्यांतील मंत्री मुंडेंचा सहभाग याबद्दल पुरावे देण्यासाठी भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील अशी शक्यता होती. दरम्यान काल दिल्ली येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या संदर्भात बैठक होऊन त्यात मुंडे यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात होती.
दरम्यान स्वत: मंत्री धनंजय मुंडे यांनी जोपर्यंत आपल्यावर आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत आपण राजीनामा देणार नसल्याचे काल माध्यमांना सांगितले. असे असले तरी दिल्ली निवडणुकांनंतर मुंडे यांच्या राजीनाम्यावर सत्ताधारी भाजपा आणि त्यांचे वरिष्ठ विचार करू शकतात असा एक होरा वर्तवला जात आहे. सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात दिल्ली येथे आहेत. त्यामुळे या प्रकरणी सध्या तरी निर्णय लांबणीवर टाकला गेलाय. पंतप्रधानांसह, गृहमंत्री व इतर वरिष्ठ सध्या दिल्लीच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सध्या तरी धनंजय मुंडे प्रकरण मागे पडले असून ५ जानेवारीला निवडणुकांनंतर भाजपाचे वरिष्ठ मोकळे झाल्यावर मात्र धनंजय मुंडेंचा फैसला होऊ शकतो असे राजकीय सूत्रांनी सांगितले आहे.