Minister portfolio : राज्याचे विधिमंडळ अधिवेशन संपत असतानाच शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. आधी माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात अशा चर्चा होत्या की अजित पवार यांना अर्थखाते दिले जाणार नाही. सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडेच राहतील. मात्र कृषी२४ ने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आणि अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळाले. तसेच राज्य उत्पादन शुल्क सारखे खातेही त्यांना मिळाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला. राजकीय चर्चांनुसार अजित पवार यांना सुरूवातीला अर्थखाते दिले जाणार नव्हते, मात्र नंतरच्या काळात घडलेल्या राजकारणामुळे अजित पवार यांना ते खाते दिले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गट नाराज होता. तर अजित पवार किंवा त्यांच्या गटाने याबाबत फारसे भाष्य केले नव्हते. त्यामुळे भाजपाने त्यांना खाते वाटपात झुकते माप दिल्याचे बोलले जातेय.
भाजपाकडे सध्या १३९ आमदारांचे पाठबळ आहे. मात्र तरीही भविष्यात त्यांना युतीशी निष्ठा राखतील असा पक्ष हवा होता. तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या रुपाने मिळाल्याने सध्या महायुती आणि भाजपाचे सरकार सुरक्षित आणि निश्चिंत झाले असल्याची चर्चा आहे. त्याचेच फळ म्हणून अजित पवार यांना अर्थमंत्री पदासह महत्त्वाची खाती दिली गेली आहेत. शिवसेनेकडे असलेले उत्पादन शुल्क हेही खाते अजित पवार यांना मिळाले आहे.
अर्थ, कृषी, वैद्यकीय शिक्षण, महिला बालकल्याण, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क अशी मह्त्वाची खाती अजित पवार यांच्या पक्षाकडे देण्यात आली आहे.