cotton varieties : नांदेड येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या दोन नवीन बीटी कापूस वाणांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण निवड समितीने औपचारिक मान्यता दिली आहे. एनएच २२०३७ बीटी बीजी २ आणि एनएच २२०३८ बीटी बीजी २ या वाणांची दिनांक १९ जून २०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आली आहे.
या वाणांचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही बीजी-२ तंत्रज्ञानावर आधारित असून सार्वजनिक क्षेत्रातील पहिलेच सरळ वाण आहेत. सरळ वाण असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात उत्पादित बियाणे पुढील दोन ते तीन वर्षे पुन्हा वापरू शकतात. त्यामुळे प्रत्येक हंगामात बियाणे विकत घेण्याची गरज भासत नाही आणि शेतकऱ्यांच्या बियाण्यावरील खर्चात मोठी बचत होते.
या संशोधनामागे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन लाभले असून, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, कापूस विशेषज्ञ डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. अरुण गायकवाड यांच्यासह संशोधन केंद्रातील संपूर्ण वैज्ञानिक व तांत्रिक चमूचे योगदान आहे. ही कामगिरी सार्वजनिक क्षेत्रातील कृषी संशोधनासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
वाणांची वैशिष्ट्येही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहेत. एनएच २२०३७ बीटी बीजी २ वाणाची उंची ९० ते ९५ सेंमी असून, याची धाग्याची लांबी २९ ते ३० मिमी इतकी आहे. याचा धागा मजबूत आणि तलम असून बोंडाचे वजन ४.५ ते ४.७ ग्रॅम आहे. हा वाण रसशोषक किडीपासून आणि विविध रोगांपासून सहनशील आहे.
दुसरा वाण एनएच २२०३८ बीटी बीजी २ सुमारे १६० ते १७० दिवसांत तयार होतो आणि तो प्रती हेक्टर १८ ते १९ क्विंटल उत्पादन देतो. या वाणाची धाग्याची लांबी २९ ते ३० मिमी असून मजबूतपणा २८ ते २९ ग्रॅम/टेक्स आहे. बोंडाचे वजन ४.८ ते ५ ग्रॅम असून हा वाणही विविध रोगांपासून व रसशोषक किडींपासून सहनशील आहे.
या वाणांना सघन लागवडीसाठी शिफारस करण्यात आली असून, मराठवाड्यासारख्या कोरडवाहू भागात याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होईल. त्यातून उत्पादनात वाढ होईल, कीड-रोग नियंत्रण सुलभ होईल आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या संशोधनामुळे देशातील कापूस शेतीत स्वावलंबन आणि टिकाव या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.












