खरीप हंगामामध्ये पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकांची फवारणी सारखी करावी लागते. सध्या कीटकनाशकांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे बराच खर्च वाढतो. हा खर्च वाचवण्यासाठी कृषी विभागाने निंबोळी अर्काचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्याकरिता निंबोळी उन्हाळ्यातमध्ये गोळा करण्याची आवश्यकता आहे.
जमिनीवर पडलेल्या व पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून, चांगल्या वाळवून, कोरड्या जागेत साठवाव्यात. ५ टक्के निंबोळी अर्काची २ हेक्टर कपाशी, तूर, हरभरा पिकांवर दोनवेळा फवारणी केली असता रासायनिक कीटकनाशकांच्या खर्चामध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत बचत होण्यास मदत होते . तसेच पेरणी अगोदर सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी, ७० ते ८० टक्क्यांपर्यंत बियाण्याची उगवण क्षमता असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे.
त्यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहते चांगले उत्पादन मिळते. माती परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येईल. खत मात्रा उशिरा दिल्यामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये घट येते. जूनच्या पहिल्या आठवड्यात मध्यम, खोल आणि उथळ जमिनीत कपाशीची धूळ पेरणी पावसाचा अंदाज घेऊन करण्यात यावी , असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.












