विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान मतदानानंतर ऊसाच्या तोडणीला वेग येणार असून गाळप हंगाम सुरळीत होणार आहे.
यंदा ऊसाचा गाळप हंगाम निवडणुकीच्या मतदानानंतर सुरू करावा असा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न होता. तर साखर कारखानदारांना मात्र ऊस पळवापळवीची काळजी लागलेली होती. याचे कारण म्हणजे शेजारच्या कर्नाटक राज्यातही ऊसाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी ठरलेल्या १५ नोव्हेंबर या तारखेलाच कारखान्याची धुराडी पेटवली, त्याआधीच अनेक भागात ऊस तोडणी कामगार दाखल झाले होते.
काल मतदानाच्या दिवशी मताचा टक्का वाढवा म्हणून ऊस कामगारांचा स्थानिक भाग असलेल्या मराठवाडा, नाशिक, नगरचा काही भागातील उमेदवार आणि पक्षांनी या कामगारांना मतदानासाठी गावी आणण्यासाठी खास व्यवस्था केली होती. त्यामुळे मराठवाड्यातील बीड, नगरचा काही भाग, नाशिकमधील मराठवाड्याला लागून असलेला भाग, परभणी, संभाजीनगरचा काही भाग अशा ठिकाणी मतदानाचा टक्का काहीसा वाढल्याचे दिसून आले.
मात्र मतदानामुळे मागच्या आठवड्यात सुरू झालेली ऊसाची तोडणीला दोन दिवसासाठी सुटी मिळाली. मतदानासाठी गावी आलेली ऊस तोडणी कामगार मंडळी आता पुन्हा तोडणीच्या कामावर परतणार असल्याने आजपासून ऊसतोडणीस वेग येणार आहे.
दरम्यान राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – ७१.७३ टक्के, अकोला – ६४.९८ टक्के, अमरावती – ६५.५७ टक्के, औरंगाबाद- ६८.८९ टक्के,
बीड – ६७.७९ टक्के, भंडारा – ६९.४२ टक्के, बुलढाणा – ७०.३२ टक्के, चंद्रपूर- ७१.२७ टक्के, धुळे – ६४.७० टक्के, गडचिरोली – ७३.६८ टक्के, गोंदिया – ६९.५३ टक्के, हिंगोली – ७१.१० टक्के, जळगाव – ६४.४२ टक्के, जालना – ७२.३० टक्के, कोल्हापूर – ७६.२५ टक्के, लातूर – ६६.९२ टक्के, मुंबई शहर- ५२.०७ टक्के, मुंबई उपनगर -५५.७७ टक्के, नागपूर – ६०.४९ टक्के, नांदेड – ६४.९२ टक्के, नंदुरबार- ६९.१५ टक्के,
नाशिक – ६७.५७ टक्के, उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,
पालघर – ६५.९५ टक्के, परभणी – ७०.३८ टक्के, पुणे – ६१.०५ टक्के, रायगड – ६७.२३ टक्के, रत्नागिरी – ६४.५५ टक्के, सांगली – ७१.८९ टक्के, सातारा – ७१.७१ टक्के, सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के, सोलापूर – ६७.३६ टक्के, ठाणे – ५६.०५ टक्के, वर्धा – ६८.३० टक्के, वाशिम – ६६.०१ टक्के,
यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.