राज्यात ऊसाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ऊस तोडणी सुरू असून आता राज्याच्या विधानसभा मतदानानंतर या कामाला वेग येणार आहे. ऊस तोडणीनंतर अनेक ठिकाणी पाचट जाळले जाते, किंवा इतर प्रकारे त्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र योग्य पाचट व्यवस्थापनातून जमिनीला आश्चर्यकारक ठरतील असे फायदे होतात.
ऊस तोडणीनंतर ऊसाचे पाचट सर्रासपणे जाळून टाकल्याने अतिशय उपयुक्त असलेल्या सेंद्रिय पदार्थाची राख होते. प्रत्यक्षात हा पर्याय सोपा वाटत असला तरी अतिशय उपयुक्त अशा सेंद्रीय घटकांची त्यामुळे राखच होत असते.
आपल्याला किती पाचट मिळते:
महाराष्ट्रात जवळपास १० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते व त्यापासून मोठया प्रमाणात ऊसाचे पाचट आपणास उपलब्ध होत असते. साधारणपणे एक हेक्टर ऊसाच्या क्षेत्रामध्ये आठ ते दहा टन पाचट उपलब्ध होते.
पाचटातून मिळतो सेंद्रिय कर्ब
ऊसाच्या पाचटामध्ये ०.४० ते ०.५० टक्के नत्र, ०.२० टक्के स्फूरद आणि १ टक्के पालाश तसेच ३२ ते ४० टक्के सेंद्रीय कार्बन असते. अशी बहुमूल्य फायद्याची पाचट जाळल्यामुळे त्यातील सेंद्रिय कर्ब पूर्णतः जळून जातो व त्यातील नत्र तसेच स्फुरद ९० टक्क्यांपेक्षा जास्त जळून जातो, हे पाचट जाळून टाकण्याऐवजी त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच रासायनिक खतांच्या किमती ह्या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ते न परवडणारे आहे.
शेतकरी जाळ्त असलेले ऊसाचे पाचट जर आपण पुढील हंगामातील ऊसात आच्छादनासाठी वापरले तर ते आपणास खूपच मोठ्या प्रमाणात फायद्याचे ठरणार आहे.
कसे करावे पाचट व्यवस्थापन
शेतामध्ये ऊस गेल्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने त्या पाचटाची भुकटी करुन घ्यावी किंवा पाचट गोळा करुन ते नवीन लागवड करावयाच्या प्रत्येक सरीमध्ये पाचट दाबून घ्यावे.
त्यानंतर त्यामध्ये प्रति हेक्टरी ६० ते ८० किलो युरिया, ९० ते १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १० ते १५ किलो पाचट कुजविणारे जिवाणू (Decomposer) वापरावे. त्यामुळे ते पाचट लवकर कुजण्यास मदत होते.
त्यातून शेतात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. तसेच अन्नद्रव्यांचीही उपलब्धता वाढते. त्यामुळे ऊस वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
सरीत पाचट बसले नाही तर..
अनेकदा पाचट जास्त असल्याने ते सरीमध्ये व्यवस्थित बसत नाही, आंतरमशागत व्यवस्थित करता येत नाही. त्यासाठी ऊस लागवडीपासून तयारी करावी.
ऊस लागवड करताना दोन सरींमध्ये चार ते साडे चार फूट एवढे अंतर ठेवून लागवड करावी. त्यामुळे ऊसातील पाचट एकाआड एक सरी पसरविल्यास मोकळ्या सरीतून आपल्याला आंतर मशागत करता येते व तसेच पट्टा पध्दतीने लागवड केल्यास अधिक चांगले, कारण मोकळ्या पट्ट्यात पाचट व्यवस्थित बसू शकते व पिकांमध्ये हवा खेळती राहण्यासही मदत होते.
पाचट जाळल्याने होणारे तोटे :
१. पाचट जाळल्यामुळे सेंद्रीय कार्बन, नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा नाश होतो.
२. पाचट जाळल्यामुळे १०० टक्के नत्र व ७५ टक्के इतर अन्नघटक वाया जातात.
३. पाचटावर असलेल्या मित्रकिटकांचा सुध्दा नाश होतो.
पाचट आच्छादनाचे फायदे :
१. जमिनीच्या पृष्ठभागावरुन होणाऱ्या बाष्पीभवनांचा वेग कमी होऊन जमिनीत ओलावा जास्त काळ टिकण्यास मदत होते.
२. पाचटाचे आच्छादन असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो
३. वेगवेगळी सेंद्रिय खते घालण्याची गरज नाही, कारण पाचटाव्दारे हेक्टरी ४ ते ५ टन सेंद्रिय खत मिळते.
४. सेंद्रिय पदार्थामुळे उपयुक्त जिवाणुंची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे जमिनीची सुपिकताही मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते.
५. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो












