Japanese technology : महाराष्ट्रातील शेतकरी आता जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक शेतीकडे वाटचाल करणार आहेत. मातीच्या पुनरुज्जीवनापासून ते ग्रीन हाऊस शेतीपर्यंत विविध पद्धतींनी शेतीतील उत्पादनक्षमता वाढवण्याचे तंत्रज्ञान राज्यात आणले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उपाययोजना, आधुनिक मॉडेल फार्म्स आणि शाश्वत शेती संकल्पना यांचा समावेश असलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे असा आहे.
शेतीसाठी आधुनिक प्रयोगशाळा आणि ज्ञानकेंद्र उभारणार
‘एम 2 लॅबो’ ही जपानमधील सुझुकी समूहाची संस्था महाराष्ट्रात शेतीविषयक उत्कृष्टता केंद्र (Center of Excellence) स्थापन करणार आहे. “एम 2 स्मार्ट व्हिलेज लॅबो” या नावाने उभारल्या जाणाऱ्या या केंद्रात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून नविन कौशल्ये शिकवली जातील. हे केंद्र शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरणार असून, शेतीत नवकल्पनांचा वापर कसा करायचा याचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जाईल.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्मार्ट शेती यांचे एकत्रीकरण
सोसायटी ५.० या जपानी संकल्पनेच्या आधारावर शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. हवामानाचा अंदाज, कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन यासाठी AI आधारित प्रणाली वापरली जाणार आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होणार असून उत्पन्न वाढण्यास हातभार लागणार आहे.
तरुणांना शेतीकडे वळवण्यासाठी ‘ज्युनियर व्हिलेज’ संकल्पना
शेती हे केवळ पारंपरिक नव्हे तर आधुनिक आणि नवनिर्मितीची संधी असलेले क्षेत्र आहे, हे दाखवण्यासाठी तरुणांना प्रेरित करण्यासाठी ‘ज्युनियर व्हिलेज’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. या माध्यमातून तरुणांना आधुनिक शेतीत प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून ते शेतीला करिअर म्हणून स्वीकारतील.
जपानमध्ये रोजगाराची संधी
या भागीदारीतून केवळ स्थानिक शेतीच नव्हे, तर जपानमध्ये भारतीय शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. एम 2 लॅबो संस्थेकडे जपानी शेतांमध्ये भारतीय कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी अधिकृत परवाना आहे. त्यामुळे प्रशिक्षित मजुरांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगाराचे दार खुले होणार आहे.
थेट फायदा शेतकऱ्यांना
या उपक्रमामुळे बाजारभावावरील अवलंबित्व कमी होऊन शेतकरी उत्पादनावर अधिक नियंत्रण ठेवू शकतील. सेंद्रिय शेती, माती परीक्षण, आणि गरजेनुसार खत वापराच्या पद्धती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सोप्या होतील. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि नफा वाढेल.
एम 2 लॅबो जपान ही सुझुकीची कृषी क्षेत्रातील संस्था असून ही सुझुकीची मुंबई, महाराष्ट्रात नोंदणीकृत झालेली पहिली संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षा युरिको कातो सान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेती समृद्ध करण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत संवाद साधला.












