रेशन दुकानातून धान्य घेत असताना ई-पॉस मशीनवर बोटांचे ठसे येत नाहीत म्हणून लाभार्थ्यांना रिकाम्या हातांनी रेशन धान्य दुकानातून परत जावे लागते. परंतु आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे. आता रेशन दुकानात २ जी ऐवजी मिळणार ४ जी ई पॉस मशीन येणार आहे.
जालना जिल्हा पुरवठा विभागाकडून एक वर्षापूर्वी आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी केली होती. ही यंत्रे पुढील सोमवारपर्यंत पुरवठा विभागाच्या ताब्यात येणार आहेत. यानंतर जालना जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये १२८० यंत्रे वाटप केली जाणार आहेत .
अंबड तालुक्यातील १९५ दुकानांसह जिल्ह्यातील १२८० दुकानांमध्ये नवीन ई-पॉस मशीन व आय स्कॅनर गन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देण्यात येणार आहेत. शासनाने रेशन धान्य वितरणामध्ये पारदर्शकता येण्यासाठी ई-पॉस यंत्रणा आणली आहे . या यंत्रानेमध्ये व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांना धान्य देण्यात येते . जिल्ह्यामधील सर्वच रास्तभाव दुकानामध्ये ई-पॉस यंत्र उपलब्ध आहेत .
काही जणांच्या बोटांवरील रेषा पुसट होत असतात . विशेषतः धुणीभांडी करणाऱ्या महिला, गवंडी काम करणारे व्यक्ती, यांना ही समस्या जाणवते. अशा लाभार्थीना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्यांचे ठसे देऊन धान्य घ्यावे लागते. त्यामुळे आता आधुनिक पद्धतीचे ‘आय स्कॅनर गन’ दिली जाणार आहेत. ई-पॉस यंत्रावर ज्या व्यक्तीच्या हाताचे ठसे येणार नाहीत. त्यांचे डोळे स्कॅन करून त्या व्यक्तींना धान्य देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांसाठी १२८० आय स्कॅनर व ४ जी ई-पॉस यंत्राची मागणी करण्यात आली होती . इतर जिल्ह्यामध्ये यंत्रांचे वाटप झालेले आहे. आधुनिक यंत्रसामग्री येत्या सोमवारपर्यंत पुरवठा विभागाकडे येईल.
नवीन अद्यावत मशीन मिळाव्यात अशी मागणी तीन वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार संघटना करत आहे. नवीन यंत्र आल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त ग्राहकांना धान्य देणे सोईचे होईल. ज्या कार्डधारकाचे बोटांचे ठसे येत नाही त्यांना नवीन मशीनमधील आय स्कॅनर तंत्रज्ञानामुळे लाभ देणे आता सोय होणार आहे.
– संभाजी कळकटे, तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना