kanda rate : मागील आठवड्यापासून कांदा आवकेत राज्यात घट होताना दिसत आहे. हाच कल या सोमवारीही पाहायला मिळाला असून रविवार नंतर सोमवारीही राज्यात आवक कमीच राहिल्याचे दिसून आले. या आठवड्यात पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी राज्यात २ लाख ५४ हजार क्विंटल आवक झाल्याचे दिसून आले.
लेट खरीपातील लाल कांदा आता जवळपास शेवटच्या टप्प्यात असून लवकरच उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे. मात्र सध्या तरी एक ते दोन आठवडे कांद्याची आवक कमीच राहिल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
दरम्यान काल नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची ५ हजार ३०० क्विंटल आवक झाली. नगर जिल्ह्यात ३३ हजार ४७४ आवक होऊन सरासरी २ हजार रुपये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळाले. नाशिक जिल्ह्यातही उन्हाळी कांदयाला सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. नाशिक जिल्ह्यात पोळ कांद्याची सोमवारी दिनांक ३ मार्च रोजी एकूण १८ हजार ८८२ क्विंटल आवक झाली. लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात सुमारे ९३ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी बाजारभाव २ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाले.
नगर जिल्ह्यात लाल कांद्याची २६ हजार ५०७ क्विंटल आवक होऊन सरासरी बाजारभाव १९०० रुपये मिळाले. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात अनुक्रमे साडे चौदा हजार आणि बावीस हजार क्विंटल आवक झाली. सरासरी दर अनुक्रमे २ हजार आणि १९०० रुपये असा आहे.
दरम्यान नाशिक जिल्हा वगळता सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यातील लाल कांदा आवक आता घटू लागली असून अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळी कांदा आवक वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात उशिरा लागवडी झाल्याने उन्हाळी कांद्याची आवक अजूनही सुरू झालेल्या नाहीत.












