
Kanda Rate : निर्यात शुल्क काढल्याने कांदा बाजारभाव वधारलेले असतानाच आता राज्यातील सर्वात मोठी बाजारसमिती असलेल्या लासलगाव-विंचूर बाजारसमितीचे लिलाव पुढील ५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता २ एप्रिललाच कांदा विक्रीसाठी आणावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवार, विंचूर (जि. नाशिक) येथे येत्या काही दिवसांत कांदा लिलाव काही कारणांमुळे बंद राहणार आहेत. शुक्रवार, २८ मार्च २०२५ रोजी कांदा व्यापारी बाहेरगावी जाणार असल्याने त्या दिवशी कांद्याचे लिलाव होणार नाहीत. मात्र, भुसार आणि तेलबिया या शेतीमालाचे लिलाव नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
शनिवार, २९ मार्च रोजी शनि अमावस्येमुळे बाजारपेठ बंद राहणार आहे. त्यानंतर सोमवार, ३१ मार्च रोजी रमजान ईदच्या निमित्ताने बाजार समितीतील कांदा लिलाव व इतर व्यवहार होणार नाहीत. तसेच, मंगळवार, १ एप्रिल रोजी बँक व्यवहार बंद असल्याने कांदा तसेच भुसार आणि तेलबिया या शेतीमालाचेही लिलाव होणार नाहीत.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी. २ एप्रिल २०२५ पासून सर्व प्रकारच्या शेतीमालाचे लिलाव नियमित वेळेत सुरू होतील, असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.