नाशिक कांद्यासाठी प्रसिद्ध असलेले लालसगाव बाजार समितीमध्ये सोमवारी 2035 वाहनांमधून सर्वाधिक 37 हजार 550 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली असून, त्याला बाजार भाव किमान 700 कमाल 2651 व सरासरी 1460 रुपये क्विंटल राहिला अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
सोमवारी बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवारात सकाळपासूनच आवक वाढली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. दिवसभरामध्ये तिथे 460 ट्रॅक्टर व 1575 पिकप असे एकूण २ हजार ३५ वाहनांतून 37 हजार 550 क्विंटल एवढ्या कांद्याची आवक झाली. रविवारी सुट्टी असल्या कारणामुळे लिलाव बंद असल्याने सोमवारी कांदा विक्रीसाठी गर्दी केली.
यापूर्वी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात 31 हजार 324 क्विंटल एवढी आवक झाली होती. अडते , व्यापारी, मदतनीस ,कामगार, व बाजार समिती सेवकांनी जलद गतीने लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे विक्रमी कांद्याची आवक वेळेत पूर्ण करण्यात त्यांना यश आले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भांडवलाची गरज असल्याने सध्या आवक वाढली असावी त्याच दिवशी लिलाव पूर्ण करून शेतकऱ्यांना रोख रक्कम दिली. सोमवारी सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल झाली.
निफाड विंचूर मध्येही मोठी आवक
लालसगाव पाठोपाठ बाजार समितीच्या निफाड व विंचूर उपबाजार मध्ये कांद्याची सर्वाधिक आवक झाली होती. निफाड मध्ये 686 वाहनांमधून सहा हजार सहाशे क्विंटल आवक झाली. तसेच तिथे किमान पाचशे ते कमाल सतराशे तर सरासरी 1350 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
विंचूरमध्ये देखील 1561 वाहनांमधून 28 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक झाली असून ,कांद्याला किमान 600 कमाल 1901 तर सरासरी 1401 एवढा भाव मिळाला.