
Onion markets : गुरूवार दिनांक १३ मार्च रोजी होळीचा सण असल्याने राज्यातील काही बाजारसमित्यांमधील लिलाव बंद राहणार आहेत. दरम्यान विंचूर आणि लासलगाव बाजारसमित्यांमधील कांदा लिलाव धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी बंद राहणार आहेत. तसेच शनिवारीही व्यवहार बंद राहणार असून सोमवारपासूनच कांदा व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत.
लासलगाव बाजारसमितीच्या व्यवस्थापनाने कळविल्यानुसार शुक्रवार दि.14/03/2025 रोजी धुलिवंदनाच्या दिवशी सर्व बँक व्यवहार बंद असल्याने कांदा लिलाव बंद राहणार आहेत. तसेच शनिवार दि.15/03/2025 रोजी कामगार व मजूर वर्ग होळी सणानिमित्त बाहेरगावी जाणार असल्याने विंचूर उपबाजार आवारावरील सर्व शेतीमालाचे लिलाव बंद राहतील. या शिवाय रविवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजारांना सुटी असते. त्यामुळे कांदा लिलाव आता थेट सोमवारीच होऊ शकणार आहेत.
दुसरीकडे उत्तरप्रदेश आणि दिल्लीसह उत्तरेकडील राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये होळी निमित्त सुटी असणार आहे. त्यामुळे गुरुवार नंतर कांदा व्यवहार कमी होणार असून त्याचा ताण सोमवारी होणार आहे. परिणामी सोमवारी किंवा मंगळवारी राज्यातच नव्हे, तर देशातील कांदा आवक एकदम वाढून भाव आणखी कमी होऊ शकतात.
त्यामुळे शेतकऱ्यांनी होळीच्या सुटीनंतर कांदा घेऊन एकदम गर्दी करू नये असे आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केले आहे.