सरकारने मनमानी धोरण अवलंबून कांदा निर्यातबंदी केली. कांदा निर्यातबंदी करण्या अगोदर सरासरी ३,५०० रुपये दर कांद्याला होता परंतु निर्यातबंदीनंतर १,८०० रुपयांपर्यंत दर खाली आले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला १,९०० ते २,००० रुपयांपर्यंत कांद्याला दर असताना आता ते १,२०० ते १,३०० रुपयांवर खाली आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी या निर्यातबंदीमुळे अडचणीत आला आहे, सरकारने निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असमाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.
कांद्यासाठी लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती मानली जाते. निर्यातबंदीनंतर कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापाऱ्यांचे अर्थकारण मात्र कोलमडले आहे. खरीप हंगामातील कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे नाइलाजाने कांदा विकावा लागत आहे.
शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन खर्चही भाव नसल्यामुळे निघत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. परिणामी, लासलगाव बाजारपेठेत भयाण शांतता आहे. हॉटेल, बांधकाम साहित्य,कृषी निविष्ठा विक्रेते, बारदाना गोणी विणकर, वाहन व्यवसाय ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. देशावर मागणी असल्याने कांदा व्यापाऱ्यांना मजूर सांभाळण्याची वेळ आली आहे.
सरकारने निर्यात बंदीचे धोरण अवलंबल्यामुळे शेतकरी अडचणीत ..
कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. , शेतकऱ्यांकडे जमिनीची नांगरट करायला सुद्धा काही शिल्लक राहणार नाही. कांदा निर्यात बंदी सरकारने करायला नव्हती पाहिजे . कांद्याचे भाव वाढले म्हणून कोणी ग्राहकांनी ओरड केली नव्हती; मात्र निर्यातबंदी झाली.
शेतकऱ्यांच्या मुळावर सरकारचे हे मनमानी धोरण आले. शेतकऱ्यांनी विरोध करूनही आता उपयोग होईना. शेतकऱ्यांचे सरकार ऐकूनच घेत नाही, असे निंबाळे (ता. चांदवड) येथील कांदा उत्पादक शेतकरी रामदास आनंदा गांगुर्डे यांनी सांगितले.
लासलगावमधील तुलनात्मक आवक व दरस्थिती
महिना…आवक (क्विंटल)…किमान…कमाल…सरासरी
डिसेंबर (१ ते ३१)…२,१३,६२४…६००…४,५५२…२,३२८
जानेवारी (१ ते २३)…२,८८,४९३…५००…१,५००…१,३००
ठळक स्थिती
– ४ ते ६.५ क्विंटलदरम्यान निर्यातबंदीपूर्वी दैनंदिन आवक होती , तर सरासरी दर ३५०० रुपये होता .
– ६ ते २० हजार क्विंटलपर्यंत निर्यातबंदीनंतर दैनंदिन आवक होती , तर सरासरी दर १३०० रुपयांवर होता .
– प्रत्यक्षात सरासरीच्या खाली दर अनेक शेतकऱ्यांना मिळाला .
-१४,५७२ शेतकऱ्यांकडून डिसेंबर महिन्यात निर्यातबंदीनंतर कांद्याची विक्री झाली तर जानेवारी महिन्यात १ ते २० तारखे दरम्यान १६,५१२ कांदा विक्री शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांना कांदे पिकवावे की नाही आता असा प्रश्न पडू लागला आहे. पंतप्रधान मोदी सांगतात, की ‘अच्छे दिन आ रहे है’ मात्र निर्यात बंदीमुळे बुरे दिन आले शेतकऱ्यांवर आहेत. १ लाख रुपये तोटा एक एकर मागे सोसण्याची वेळ आली आहे. आम्हाला कुठले अनुदान नको, कर्जमाफी नको पण आता कांद्याला हमीभाव पाहिजे. साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान कांद्याला भाव नसताना देण्याचे जाहीर केले. दोन हप्ते काही ठिकाणी मिळाले, आमच्या पदरी मात्र अजून काही मिळाले नाही.
– राकेश कानडे, कांदा उत्पादक, शिरसगाव, ता. येवला












