Opportunities for youth : राज्य शासनाने युवाशक्तीला प्रशासकीय प्रक्रियांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६” जाहीर केला आहे. या कार्यक्रमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा थेट अनुभव मिळणार असून त्यातून त्यांचे नेतृत्व, धोरण समज, आणि सामाजिक जाण यामध्ये मोठी वाढ होणार आहे. अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिल ते ५ मे २०२५ दरम्यान आहे.
या कार्यक्रमासाठी राज्यभरातून केवळ ६० फेलोंची निवड होणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक फेलोला दरमहा ५६,१०० रुपये मानधन आणि ५,४०० रुपये प्रवास भत्ता मिळून एकूण ६१,५०० रुपये मिळणार आहेत. यामुळे उच्च शिक्षित व प्रशासनामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
या फेलोशिपसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात, मात्र किमान ६०% गुण आणि किमान एक वर्षाचा पूर्णवेळ अनुभव आवश्यक आहे. अनुभव हा इंटर्नशिप, आर्टिकलशिप, स्वयंरोजगार यामधूनही ग्राह्य धरला जाईल. वयाची अट २१ ते २६ वर्षांदरम्यान असून अर्ज शुल्क ५०० रुपये आहे.
मराठी भाषेचा लेखी व तोंडी ज्ञान, तसेच इंग्रजी व हिंदी भाषा आणि संगणक हाताळणी आवश्यक आहे. उमेदवारांनी mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल – वस्तुनिष्ठ ऑनलाईन चाचणी, ऑनलाईन निबंध लेखन व अंतिम मुलाखत. अंतिम निवड झालेल्या फेलोंना राज्यातील २० निवडक जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम दिले जाईल.
या फेलोशिपमध्ये आयआयटी मुंबईच्या सहकार्याने सार्वजनिक धोरण या विषयावर एक पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. व्याख्याने, कार्यशाळा, क्षेत्रभेटी आणि मान्यवरांशी संवाद यातून फेलोंना प्रशासकीय कामाचा सखोल अनुभव मिळेल.
हा कार्यक्रम केवळ शिष्यवृत्तीवर आधारित नसून, तरुणांच्या नेतृत्व क्षमतेला दिशा देणारा एक व्यासपीठ ठरणार आहे. भविष्यात प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी ही संधी नक्कीच सोडू नये.












