केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना ही शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २,०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यामध्ये प्रती वर्षी रू. ६,०००/- रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले कुटुंब ,लागवडीलायक क्षेत्रधारक, पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील ९०.२० लाख लाभार्थ्यांनी केलेली आहे.
दिनांक ०५ जून, २०२४ ते १५ जून, २०२४ या कालावधीत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात आली आहे .
राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व e-KYC साठी सहभागी करण्यात आले आहे.
त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी.
यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थींनी संबंधित तलाठी/तहसील कार्यालयामध्ये संपर्क करावा . त्याचप्रमाणे केंद्र (CSC) व इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या मार्फत eKYC व बँक खाती आधार संलग्न करणे हि कामे करावी .
जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पी.एम.किसान योजनेचा १७ वा हप्त्याचा लाभ बँक खात्यात जमा करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे.
योजनेसाठी नोंदणी करणे,बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, ई-केवायसी करणे, या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.