
Red alert : रविवारी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचे दाणादाण उडवली, दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या १६ जून रोजी सकाळी दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील कोकण भागात अतिवृष्टीची शक्यता असून ‘रेड’ अर्ल जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भात १८ आणि १९ जूनला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. देशाच्या ईशान्य भागात सतत अतिवृष्टी होणार असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा धोका आहे. महाराष्ट्रात सध्या कोकण भाग वगळता इतर भागांमध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी आहे.
महाराष्ट्रात सध्या मॉन्सूनची स्थिती काय?:
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनची सीमारेषा सध्या मुंबई, (अहिल्यानगर), आदिलाबादमार्गे विदर्भात पोहोचली आहे. याचा अर्थ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश भागांत मॉन्सून सक्रिय झाला आहे. मात्र मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत अजूनही पावसाची नियमितता आलेली नाही. पुढील २४ तासांत या भागांमध्ये मॉन्सूनचा पुढील विस्तार होण्याची शक्यता वर्तवली आहे.
साप्ताहिक हवामान अंदाज:
कोकण आणि गोवा भागात १६ ते २१ जूनदरम्यान रोजचाच पाऊस राहणार आहे. विशेषतः १६ जून रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात १६ व १७ जूनला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नंतरच्या दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊन तो तुरळक स्वरूपाचा राहील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पेरणीपूर्व मशागत सुरू आहे, मात्र सलग पावसाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात करण्यास अजून प्रतीक्षा करावी असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले आहे.
विदर्भात १६ ते २२ जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज असून १८ व १९ जूनला काही भागांत जोरदार ते अतिवृष्टी होऊ शकते. नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी सखल भागात पाणी साचू नये याची दक्षता घ्यावी.
मराठवाड्यात १६ ते २२ जून दरम्यान तुरळक पावसाची शक्यता आहे. या भागात अजूनही समाधानकारक पर्जन्यमान नाही. शेतकऱ्यांनी अजून काही दिवस पेरण्या टाळाव्यात, कारण जमिनीत पुरेसे ओलसरपणा नाही.
महाराष्ट्रात कोणते पावसाचे इशारे दिले आहेत?
दरम्यान १६ जून रोजी कोकणात ‘रेड कलर वॉर्निंग’ दिली आहे. याचा अर्थ प्रशासन आणि नागरिकांनी तत्काळ कृती करावी लागेल, विशेषतः जलभराव, वाहतूक विस्कळीत होणे, नदी पात्रांमध्ये अचानक पाणी वाढणे अशा आपत्कालीन गोष्टींसाठी सज्जता हवी.
मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज असून, तिथे देखील हवामान विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रात विशेष इशारा नाही.
देशातील तातडीचे पावसाचे इशारे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण आणि किनारी कर्नाटकात १६ जून रोजी २० सेंमीहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व लक्षद्वीपमध्ये ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात म्हणजेच अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम व त्रिपुरामध्ये १६ ते २१ जूनदरम्यान दररोज अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे. या भागांमध्ये भूस्खलन, पूर व वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यता आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचे अंदाज आहेत. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ५०-७० किमी प्रतितास असेल, त्यामुळे झाडे उन्मळणे, विजेच्या तारांचे नुकसान होणे अशा घटना संभवतात.
एकूणच महाराष्ट्रात मॉन्सूनचा विस्तार सुरू असून काही भागांत पावसाचा जोर वाढत आहे. कोकणात मुसळधार पावसाचा धोका असून रेड रंगाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात देखील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात अजून प्रतीक्षा आहे. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून योग्य नियोजन करावे, यामुळे संभाव्य नुकसान टाळता येईल.