राज्यातील बहुतेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला दिसत आहे. कोकण घाट माथ्यावर काही भागांमध्ये जोरदार सरी पडल्या. पण इतर ठिकाणी पावसाची उघडीप होती .विदर्भ व मराठवाड्यामध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
राज्याच्या काही भागात जोरदार पावसाला पोषक हवामान निर्माण झालेले आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थिती पेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. कमी दाबाचा पट्टा हा कोटा ,शिवपुरी, बालासोर ,सिद्धी, बंगालचे उपसागराच्या मध्यापर्यंत आहे.
दक्षिण गुजरात वर ईशान्य अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिणेकडे आलेला मान्सूनचा आस आणि किनारपट्टी लगत चक्राकार वारे यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे . राज्यात अनेक भागांमध्ये कालपासून पावसाचा जोर कमी झालेला असून काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत .पण कोकण आणि घाट माथा वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी राहिला आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र ,विदर्भ ठिकठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे
मराठवाड्यात खानदेशात काही ठिकाणी पावसाच्या सरी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. तसेच कोकण मध्य महाराष्ट्र मधील सातारा ,पुणे, विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर ,वर्धा ,नागपूर, भंडारा ,गडचिरोली ,व गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.