देशभरात एकीकडे उष्णतेचा पारा चढतच असताना राज्यात मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे विदर्भात मात्र अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवस विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इतर काही ठिकाणी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावरण ढगाळ राहील. राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल मात्र तीव्रता कमी असेल. पुढील आठवडा पुण्यातील वातावरण अंशतः ढगाळ असणार आहे. जळगाव जिल्ह्यातही पाऊस येणार नाही, मात्र ढगाळ वातावरण होऊ शकतं. दरम्यान, शनिवारी ज्येष्ठ महिना सुरु झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. मात्र, 26 तारखेला काही प्रमाणात ढगाळ वातावरण होणार आहे.
राज्यातील हवामानात यंदाच्या उन्हाळ्यात वेगळंच हवामान पाहायला मिळालं. मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं. तर, एप्रिल महिन्याने पावसाचा सर्व उच्चांक मोडला. यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला वातावरणात काहीसा गारवा होता. मात्र, काहीच दिवसात मे महिन्यात कडक उन्हाळा पाहायला मिळाला. सध्या राज्यातील बहुतेक भागांमध्ये उष्णतेनं नागरिकांना हैराण केलं आहे. तर विदर्भात मात्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात तापमान 40 अंशापर्यंत खाली येणार आहे. परंतु, 26 तारखेनंतर तापमानात पुन्हा वाढ होणार आहे.
source:- lokmat