Rabi planting : रबी हंगामात यंदा देशात विक्रमी लागवड..

Rabi planting : देशभर रबी हंगामात यंदा पिकांची विक्रमी लागवड झाली असून, गहू, तांदूळ, डाळी आणि तेलबियांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. सरकारने ३ मार्च २५ पर्यंतच्या रबी हंगामाच्या जाहीर केलेल्या अहवालानुसार, यावर्षी रबी हंगामात एकूण 661.03 लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिके घेतली गेली, जी मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे.

गव्हाची लागवड 324.88 लाख हेक्टरवर झाली असून, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू घेतला जात आहे. काही ठिकाणी गव्हाचे पीक काढणीस आले आहे, तर इतर भागांत ते परिपक्व होत आहे. तांदळाची लागवड 42.54 लाख हेक्टरवर झाली असून, तमिळनाडू आणि त्रिपुरासारख्या राज्यांमध्ये त्याची काढणी सुरू आहे.

डाळींच्या पिकात मोठी वाढ दिसून आली आहे. हरभऱ्याची लागवड 98.55 लाख हेक्टरवर झाली असून, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये त्याची काढणी सुरू झाली आहे. याशिवाय उडीद, मूग, मसूर आणि मटकीची लागवडही वाढली आहे.

तेलबियांच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे. यंदा 97.47 लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली असून, त्यात मोहरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये मोहरीची काढणी सुरू आहे.

श्री अन्न (म्हणजे ज्वारी, बाजरी, रागी आणि मका) यांची लागवडही वाढली असून, यंदा 55.25 लाख हेक्टरवर ही पिके घेतली गेली. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये ज्वारी आणि बाजरीची काढणी सुरू आहे.

हवामानाच्या अनुकूल परिस्थितीमुळे आणि पुरेशा पाणीपुरवठ्यामुळे रबी हंगामात चांगले उत्पादन अपेक्षित आहे. सरकारच्या अहवालानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी जास्त क्षेत्रात लागवड केली आहे, त्यामुळे अन्नधान्य आणि तेलबिया उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply