दुधाच्या दरात उन्हामुळे ३० टक्क्यांपर्यंत घट झाली.पशुखाद्याचे वाढते दर ,पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न, त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटरचा २९ रुपयांचा दर पुन्हा २७ रुपयांवर आला आहे. यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेला असताना काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर अनेक दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहे.
दूध उत्पादकांना दोन रुपये दर कमी केल्यापासून दर दिवसाला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त तर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ३४ रुपये दर दिला जात नसल्यामुळे प्रति लिटरला सात रुपयांप्रमाणे दररोज दूध उत्पादकानांना १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक फटका बसत असल्यामुळे दूध उत्पादक अधिक अडचणीत आले .
राज्यामध्ये साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत गाईच्या दुधाचे संकलन होत असते. कमी पाणी असलेल्या भागातील शेतकरी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय करत असतात . नगरसह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर , नाशिक, पुणे,, मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांत तीव्र उन्हाळा असल्यामुळे उष्णता खूप आहे.
बहुतांश भागामध्ये पाण्याची टंचाई आहे. त्याचा थेट परिणाम दूध व्यवसायावर होत असताना दिसत आहे. साधारणपणे ३० ते ४० लाख लिटरपर्यंत दुधामध्ये उष्णतेमुळे घट झाली आहे. उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यामध्ये लग्नसोहळे व अन्य कार्यक्रमामुळे दुग्धजन्य पदार्थाला मागणी वाढलेली आहे. असे असताना दर कमी केल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मागील वर्षी या दिवसामध्ये दुधाला ३५ रुपयांच्या आसपास प्रति लिटरला दर होता. परंतु या वर्षी सात ते आठ महिन्यांपासून सतत खरेदीदार दुधाचे भाव कमी करत आहेत. ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर भाव द्यावा, या बाबत शिफारस करण्यात आली .
परंतु पशुसंवर्धन विभाग आणि खरेदीदार संघांनी त्याकडे दुर्लक्ष केले.गाईच्या दुधाला मागील काही दिवसांपासून पंचवीस रुपये प्रति लिटरला दर होता. मागील दीड महिन्यापूर्वी तो २७ रुपये केला होता त्यानंतर ११ मे ला २ रुपयांनी त्यात वाढ करण्यात आली . परंतु पुन्हा २५ मे पासून २ रुपयांनी दर कमी केले आहेत. त्यामुळे २९ रुपयांपर्यंत पोहोचलेले दुधाचे दर आता परत २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे.
दुधाला मिळणारा दर कमी मिळत आहे. त्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांला मागणी नसल्याचे कारण पुढे करत खरेदीदार दूध संघांकडून दुधाचे भाव कमी करत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत .शेतकरी तोट्यात दूध धंदा करत आहेत. दूध उत्पादकांचा मागील सहा महिन्यांचा विचार केला तर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागला आहे.
जनावरे जगवण्यासाठी कसरत
राज्यामध्ये पंचवीस जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. दुष्काळी भागामध्ये चारा डेपोही उभारले नाहीत, यंदा छावण्या सुरू केल्या नाहीत, त्याऐवजी चारा उत्पादन करण्यावर भर दिला. परंतु राज्यातील अनेक भागांत चारा, जनावरांसाठी पिण्याचे पाणी मिळवताना दूध उत्पादकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . अशी परिस्थिती असताना देखील दुधाचे दर पाडून दूध व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप दूध उत्पादक शेतकरी करत आहेत.
दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत राज्य शासनाच्या अनास्थेमुळे भाव मिळत नाही. साधारण दुधाला पस्तीस रुपये दर मिळायला पाहिजे . कारण पशुखाद्याचे दर वाढत असताना दर कमी करत असल्याने मोठे नुकसान होत आहे.,अनेक शेतकऱ्यांकडे घरचा चारा नाही, त्यामुळे हा व्यवसाय कसा जगवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. देविदास पिसे, दूध उत्पादक शेतकरी, मोहोज देवढे, ता. पाथर्डी, जि. नगर