नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नाफेड’मार्फत उन्हाळ कांदा खरेदी सुरू करण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी निवेदन दिले.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगतले कि मंत्री गोयल यांच्या बरोबर सकारात्मक चर्च्या झाली असून लवकरच उन्हाळी कांदा खरेदी ‘नाफेड’ मार्फत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सद्यःस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किमती विचारात घेता ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी याकडे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. ग्राहक व्यवहार विभाग, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार, कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते.
कांद्याची खरेदी शेतकरी उत्पादक कंपनी व महासंघामार्फत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्थांकडून फार्म गेटवर तसेच सहकारी संस्थांमार्फत लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये प्रचलित बाजार दरांनुसार खुल्या लिलावाद्वारे केली जाते.
चालू हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले परंतु अवकाळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक आपत्तींतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय मंत्री गोयल यांच्याशी त्यांनी चर्चा केली. नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागील हंगामातील लाल कांदा ‘नाफेड’मार्फत खरेदी केल्याने केंद्रीय मंत्री गोयल यांचे आभार मानले.
या वेळी गोयल यांनी लवकरच खरेदी सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले, मात्र तारीख नसल्याने त्यात कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे ‘नाफेड’ कांदा खरेदी, ती नेमकी कधी सुरू होणार हे पाहणे अपेक्षित आहे.
मागीलवर्षी २ लाख ३८ हजार टन कांदा खरेदी
राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत मागील वर्षी २०२२ मध्ये रुपये ३५१ कोटी रकमेचा २ लाख ३८ हजार १९६ टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यात सरासरी रुपये १ हजार ४७५ प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता. यावर्षीदेखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने ‘नाफेड’मार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदी करण्यात येईल, असे गोयल यांनी सांगितले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.
source:-esakal