Relief for Sangli Kolhapur : पूरग्रस्त सांगली-कोल्हापूरसाठी दिलासा; लघुपाटबंधारे व साठवण तलावांना गती…

Relief for Sangli Kolhapur

Relief for Sangli Kolhapur : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी पूरप्रश्न नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे. दरवर्षी होणाऱ्या महापुरामुळे पिकांचे, जमिनींचे आणि आर्थिक नुकसान होत असते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता पूर नियंत्रणाच्या दिशेने महत्त्वाचे पावले उचलली जात आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मोठ्या धरणांच्या कॅचमेंट क्षेत्राबाहेरील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण करण्यासह नवीन साठवण तलाव बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे धरणांवर येणारा एकतर्फी पाण्याचा भार कमी होईल. लहान साठवण प्रकल्पांमुळे पुराचे पाणी पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे अडवता येईल. परिणामी गावपातळीवर पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांचे पीकांचे नुकसान टळेल. यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात पाण्याची उपलब्धता अधिक ठरेल.

या प्रस्तावित प्रकल्पांमुळे केवळ पूर नियंत्रणच नव्हे तर जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचे व्यवस्थापन यामध्येही मोठी सुधारणा अपेक्षित आहे. पूरप्रवण भागात पाणी साचून राहण्याऐवजी नियोजनबद्ध साठवण होणार असल्याने शेतीला अधिक पाणी मिळेल आणि जमीनसुधारणा होण्यास मदत होईल.

ही कामे ‘मित्र’संस्थेमार्फत केंद्र शासनाच्या निधीअंतर्गत राबवण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. दरवर्षी वाढणाऱ्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थैर्य मिळावे, त्यांचे नुकसान कमी व्हावे आणि शेती अधिक फायदेशीर व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.