Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यानंतर ५०० पर्यटक राज्यात सुखरूप पोहोचले..


Pahalgam attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले आहेत. इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांच्या विशेष उड्डाणांद्वारे १८४ पर्यटक काल मुंबईत दाखल झाले.

काश्मीरमध्ये अडकलेल्या उर्वरित महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी आजच्या २५ एप्रिलच्या दिवशी आणखी एक विशेष विमान रवाना करण्यात येत आहे. या विमानातून अकोला आणि अमरावती जिल्ह्यांतील सुमारे २३२ प्रवासी मुंबईकडे रवाना होतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मीरला पाठवले होते. त्यांनी लष्कराच्या रुग्णालयात दाखल झालेल्या जखमी पर्यटकांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलद्वारे या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानले.

पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे समन्वय साधणारी त्रिस्तरीय यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या मदतविनंतींवर या यंत्रणेद्वारे तत्परतेने प्रतिसाद दिला जात आहे. काही पर्यटक जम्मू येथील कालिका धाम येथे थांबले असून, त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावतीच्या १४ पर्यटकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

जम्मूमधून काही पर्यटक दिल्लीकडे स्वतःच्या प्रयत्नाने पोहोचले असून, त्यांच्यासाठी महाराष्ट्र सदनात निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच्या विशेष विमानानंतर परिस्थितीनुसार उद्याही आवश्यक वाटल्यास आणखी उड्डाणांची व्यवस्था करण्यात येईल, अशी तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संकटग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.