Monsoon forecast : मॉन्सूनच्या दुसऱ्या अंदाजाने दिलासा; राज्यात जूनमध्ये किती पडणार?

Monsoon forecast : भारत हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, 2025 मधील जून ते सप्टेंबरदरम्यानचा दक्षिण-पश्चिम मॉन्सून देशात एकूण सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभर सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असून, ±4 टक्क्यांचा फरक शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाच्या आधारावर खरीप हंगामाची तयारी करता येईल.

मॉन्सूनचा महत्त्वाचा विभाग, म्हणजे देशातील मुख्य कृषी भाग, यामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता बहुतांश देशात चांगल्या प्रमाणात पावसाची नोंद होईल.

महाराष्ट्रात पावसाचा भरगोस अंदाज:

महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान सर्वसाधारणपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
कोंकण व गोवा विभागात 107 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस,
मध्य महाराष्ट्रात 110 टक्क्यांपेक्षा जास्त,
मराठवाड्यात 112 टक्क्यांपेक्षा जास्त
आणि विदर्भात 109 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

हा अंदाज लक्षात घेता खरीप पिकांची निवड आणि शेती नियोजन करण्यात शेतकऱ्यांना मदत होईल.

जून महिन्यात असा असेल पाऊस?

देशभरात जून महिन्यातील एकूण पावसाचे प्रमाण सरासरीच्या 108 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे मॉन्सूनची सुरुवात दमदार होईल असे संकेत आहेत.

महाराष्ट्रातही जूनमध्ये बहुतांश भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र, प्रायद्वीपीय भारतातील काही दक्षिणी भागांत, तसेच ईशान्य भारतात काही ठिकाणी जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो.

कमी पावसाचा धोका नाही..
देशभरात सरासरीपेक्षा कमी (90 टक्क्यांपेक्षा कमी) पावसाची शक्यता फक्त 2 टक्के आहे. 96 ते 104 टक्के सरासरी पावसाची शक्यता 31 टक्के आहे तर 105 ते 110 टक्के पावसाची शक्यता सर्वाधिक म्हणजे 32 टक्के आहे. यावरून यंदाचा मॉन्सून सर्वसाधारणत: समाधानकारक राहील, असा विश्वास बाळगता येतो.

महाराष्ट्राच्या जवळील राज्यांत असा असेल पाऊस?

या वर्षी अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. त्यामध्ये काही प्रमुख राज्यांची माहिती खालीप्रमाणे आहे.

कर्नाटक:
कर्नाटक किनारपट्टी: 106 टक्क्यांपेक्षा जास्त
उत्तर आंतरराज्यीय कर्नाटक: 111 टक्क्यांपेक्षा जास्त
दक्षिण आंतरराज्यीय कर्नाटक: 108 टक्क्यांपेक्षा जास्त

गुजरात:
संपूर्ण राज्यात: 114 टक्क्यांपेक्षा जास्त
सौराष्ट्र व कच्छ: 119 टक्क्यांपेक्षा जास्त

मध्य प्रदेश:
पश्चिम: 109 टक्क्यांपेक्षा जास्त
पूर्व: 108 टक्क्यांपेक्षा जास्त

तेलंगणा:
111 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची शक्यता

आंध्र प्रदेश:
आंध्र किनारपट्टी: 109 टक्क्यांपेक्षा जास्त
रायलसीमा: 112 टक्क्यांपेक्षा जास्त

राजस्थान
पश्चिम राजस्थान: 115 टक्क्यांपेक्षा जास्त
पूर्व राजस्थान: 110 टक्क्यांपेक्षा जास्त

उत्तर प्रदेश
पश्चिम यूपी: 112 टक्क्यांपेक्षा जास्त
पूर्व यूपी: 110 टक्क्यांपेक्षा जास्त

हे आकडे लक्षात घेतल्यास, या राज्यांमध्ये खरीप हंगाम चांगल्या उत्पादनासाठी पोषक ठरेल. मात्र, जास्त पावसामुळे काही ठिकाणी पूर किंवा पाणी साचणे यासारखी संकटे येऊ शकतात, त्यामुळे योग्य नियोजन गरजेचे आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या पुढील अद्ययावत अंदाजांवर लक्ष ठेवून पेरणीचे व अन्य शेतीविषयक निर्णय घ्यावेत. प्रारंभिक इशारे, स्थानिक हवामान सल्ला व शासकीय मार्गदर्शन यांचा लाभ घ्यावा. यंदा पावसाचे स्वरूप सकारात्मक असले तरी सावध आणि सजग राहूनच पुढील पावले उचलावीत.10:24 AM