देशात होणाऱ्या हळद उत्पादनाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली असून . अरबी देशांसह हळदीची मागणी अमेरिका आणि युरोपीय देशांतून वाढल्यामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात मध्ये देशातून १ लाख ७० हजार ८५ टन हळदीची निर्यात झाली आहे. १७ हजार टनांनी हळद निर्यातीत सन २०२१-२२च्या तुलनेत वाढ झाली आहे.
देशातून एकूण हळद उत्पादनाच्या सरासरी १३ टक्के हळद दर वर्षी निर्यात होते, असे सांगलीतील कसबे डिग्रज येथील हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी म्हणाले, सन २०२१-२२मध्ये ही निर्यात १८ टक्क्यांवर गेली होती, तर २०२२-२३मध्ये हळद निर्यात २० टक्क्यांपर्यंत गेली आहे. देशातून एक लाख ८३ हजार ८६८ टन हळदीची निर्यात सन २०२०-२१मध्ये झाली होती, मात्र २०२१-२२मध्ये हळद पिकाला पोषक स्थिती नसल्यामुळे निर्यातीत ३१ हजार टनांनी घट झाली होती. २०२२-२३ मध्ये निर्यातीत वाढ झाली त्यामुळे हळद उत्पादकांना दिलासा मिळाला .
जागतिक पातळीवर हळद उत्पादनात भारत देश अग्रेसर आहे. देशात महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक,आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते. देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा वाटा पन्नास टक्के आहे. मागील काही वर्षांपासून प्रामुख्याने अमेरिकेसह युरोपीय देश, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, जपान यासह अनेक देशांत भारतातून हळदीची निर्यात होते.
भारतातून युरोप आणि अमेरिकाला उच्च दर्जाच्या हळदीची निर्यात होत असते . या देशाच्या तुलनेने अरबी देश, आग्नेयेकडील देशांना मध्यम प्रतीच्या हळदीची निर्यात होते. मसाल्याचा पदार्थ म्हणून अरब देशांत हळदीचा वापर होतो. अमेरिका आणि युरोपीय देशांत राहत असलेल्या भारतीयांकडून मसाल्याचा पदार्थ म्हणूनच हळदीची मागणी जास्त प्रमाणात होते . त्या खालोखालच हर्बल उत्पादने, आयुर्वेदिक उत्पादने ,सौंदर्य प्रसाधने, आणि औषधांमध्ये हळदीचा वापर वाढला आहे.
हळद निर्यातीवर दृष्टिक्षेप
वर्ष | निर्यात (टनात) | उलाढाल (कोटीत) |
२०१९-२० | १,३७,६५० | १२८६ |
२०२०-२१ | १,८३,८६८ | १७२२ |
२०२१-२२ | १,५२,७५८ | १५३४ |
२०२२-२३ | १,७०,०८५ | १६६६ |
विदर्भ, मराठवाड्यात क्षेत्र वाढले
२०२२-२३ मध्ये निर्यातीसाठी हळदीला मागणी वाढली होती, त्यामुळे दरातही तेजी राहिली. देशाच्या एकूण हळद उत्पादनात राज्याचा वाटा पन्नास टक्के आहे. आता हळदीचे क्षेत्र विदर्भ आणि मराठवाड्यात वाढले आहे. त्यामुळे राज्याच्या एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के उत्पादन हे विदर्भ आणि मराठवाड्यात होत आहे, अशी माहिती सांगली येथील हळदीचे व्यापारी गोपाळ मर्दा यांनी दिली.