सातबारा प्रॉपर्टी कार्ड मधील चूक दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1967 कलम 155 चा वापर केला जातो .आता यातील चूक दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे .
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. एक ऑगस्ट पासून हे कामकाज सुरू होणार आहे . नागरिकांना अर्जाची ऑनलाईन ट्रैकिंग करता येणार आहे. यातून बराच वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होणार आहे.
महा-ई-सेवा केंद्र द्वारे ऑनलाईन पद्धत..
कलम 155 च्या आदेशानुसार मागच्या कित्येक वर्षापासून चुकीची दुरुस्ती करण्यासाठी, करण्यात येणारे अर्ज तलाठ्याकडे केले जात होते . आता ते महा-ई-सेवा केंद्र द्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यातून अर्ज सादर केलेली तारीख व वेळ निश्चित होणार आहे. त्यानुसार संबंधित अर्जावर वेळेत निर्णय घ्यावा लागणार आहे. यामुळे विनाकारण तसेच विशिष्ट हेतूने अर्ज प्रलंबित ठेवण्याचे प्रकार कमी होणार आहेत.
”सरकारी काम आणि सहा महिने थांब” या पद्धतीने प्रशासकीय यंत्रणेचा कारभार चालतो असे अनेक वेळा आरोप केले जातात. कलम 155 अन्वये एखादी चूक दुरुस्त करायची असेल तर अनेक तहसीलदार कार्यालय तसेच नगर भूमापन उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज संथ गतीने असते.
यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो तसेच नागरिकांची आर्थिक पिळवणूक सुद्धा होते. आर्थिक तडजोड झाली नाही तर संबंधितांची फाईल देखील बंद केली जाते. यातून नागरिकांचे मोठे नुकसान होते. सातबारा उतारावर खरेदी, मृत्युपत्र ,बक्षीस पत्र ,हक्कसोड, दत्तकपत्र ,वारसा, बोजा नोंद, बोजा कमी करणे, इत्यादी होणाऱ्या फेरफार नुसार नोंदी होत असतात या नोंदीचा अमल करताना .
अनेक सातबारा उताऱ्यात चूक होत असते . कधी क्षेत्र बदलते. तर कधी नावे चुकतात कधी नावाची नोंदच होत नाही, तर काही वेळेस असलेले नाव उताऱ्यावरून जाते. अशीच परिस्थिती प्रॉपर्टी कार्डमध्ये ही होत असते यामुळे महसूल विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे.