
Onion rate : गेल्या आठवड्यात राज्यातील कांदा बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक तुलनेने कमी झाली असून देशभरातही अशीच स्थिती दिसून येत आहे. १६ ते २१ जून या सहा दिवसांत महाराष्ट्रातील बाजारात कांद्याची आवक दररोज कमी होत गेल्याचे नोंदले गेले आहे.
१६ जून रोजी एकूण आवक ३ लाख २८ हजार क्विंटल होती. त्यानंतर १७ जूनला ही आवक किंचित वाढून ३ लाख ४६ हजार क्विंटल झाली. मात्र त्यानंतर सतत घट होत गेली. १८ जून रोजी २ लाख ७० हजार, १९ जून रोजी २ लाख ४१ हजार, २० जूनला २ लाख २५ हजार तर २१ जून म्हणजेच शनिवारी फक्त १ लाख ४२ हजार क्विंटल कांद्याची नोंद झाली.
८ ते १४ जून या कालावधीत राज्यातील एकूण कांदा आवक १ लाख ७१ हजार मेट्रिक टन होती. तर मध्य प्रदेशातून ५४ हजार, गुजरातमधून ३५ हजार, उत्तर प्रदेशातून ४५ हजार, राजस्थानमधून ८,७०० आणि कर्नाटकातून ३,२०० मेट्रिक टन कांदा आला होता.
याच्या तुलनेत १५ ते २१ जून या आठवड्यात देशातील एकूण कांदा आवक ३ लाख ३७ हजार मेट्रिक टन इतकी झाली. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक १ लाख ७३ हजार मेट्रिक टन कांदा आला असून यामध्ये थोडीशी वाढ दिसून आली. मध्य प्रदेशातून आवक वाढून ६० हजार मेट्रिक टन झाली. मात्र उत्तर प्रदेश (४२ हजार), राजस्थान (६ हजार) आणि कर्नाटक (२,५००) या राज्यांमधून येणारी आवक घटली आहे. गुजरातमधूनही फक्त १८ हजार मेट्रिक टन कांदा बाजारात आला.
ही आकडेवारी पाहता देशातील प्रमुख उत्पादक राज्यांतील कांद्याची सध्या साठवणूक सुरु असल्याने बाजारात येणाऱ्या कांद्याची मात्रा कमी झाली आहे. विशेषतः उत्तर भारतातील राज्यांतून आवक घटल्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कांद्याची मागणी वाढत असल्याने व्यापाऱ्यांकडून निर्यातीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
ज्यांच्याकडे चांगल्या प्रतीचा कांदा शिल्लक आहे, त्यांनी थेट विक्रीऐवजी दरवाढीची वाट पाहणे फायद्याचे ठरू शकते. तसेच शेतमाल साठवताना योग्य हवाप्रवाह आणि आर्द्रता नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. बाजारभावाच्या दृष्टीने येणाऱ्या आठवड्यात हालचाल अधिक जाणवेल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.