
Soybean market price : आज सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची १३ हजार ६०० क्विंटल आवक दुपारपर्यंत झाली. कमीत कमी बाजारभाव ३८८५ तर सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतके दिसून आले. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात बाजारभावात घट झाल्याचे दिसून येत आहे.
आज अकोला बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजार, हिंगोली बाजारात ३८५०, धुळे बाजारात ३८३०, राजुरा बाजारात ३८५५, कर्जत बाजारात ४ हजार प्रति क्विंटल सरासरी सोयाबीनचे दर दिसून आले. मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी जेव्हा सोयाबीन बाजार सुरू झाले तेव्हा सर्वच बाजारातील दरांत काहीशी घट झालेली दिसून येत आहे.
सोयाबीन हमीभाव खरेदीला राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिलेली असली, तरी एकूण उद्दिष्टापेक्षाही कमी खरेदी झाली आहे. आजतागायत बारदाना नसणे, नावनोंदणीत अडचणी, शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारणे, आर्द्रतेचे मुद्दे असे अनेक प्रश्न सध्या सरकारी हमीभाव खरेदीपुढे असल्याने मुदत संपत आलेली असतानाही सोयाबीन खरेदी पुरेशी झालेली नाही.
त्याचा परिणाम मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजारातील दर खालावलेले असून या आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव आणखी घसरले आहेत. दरम्यान ३१ जानेवारीनंतर सोयाबीन हमीभावाने खरेदी बंद होणार असून त्यानंतर मात्र राज्यात सोयाबीनचे दर आणखी खाली येण्याची शक्यता या विषयातील जाणकारांनी व्यक्त केली आहे