Soybean prices market : नाफेडने सोयाबीन बाजारात विकल्याने सोयाबीन बाजारभाव घसरले; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..

Soybean prices market

Soybean prices market : नाफेडने शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेला सोयाबीन या आठवड्‌यात बाजारात विकल्याने सोयाबीन तेलाचे बाजारभाव गडगडले असून इतर तेलांवरही परिणाम झाला आहे. दुसरीकडे बाजारातील सोयाबीनवरही त्याचा उलटा परिणाम झाला असून या आठड्यात सोयाबीनचे दर किमान २५०० आणि कमाल ३४ रुपयांवर येऊन ठेपले आहेत.

या आठवड्‌यात सोयाबीनच्या किंमती अपवाद वगळता ४ हजाराच्या खालीच आहेत. अनेक ठिकाणी सरासरी ३४०० रुपये ते ३८०० रुपये प्रति क्विंटल दर सोयाबीनला मिळत आहेत. तर बऱ्याच बाजारात किमान दर हे २५०० रुपयांपर्यंत खाली आल्याचे दिसून येत आहे.

नाफेडने हमीभावाने यंदा शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी केली, पण ते सर्वच शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करू शकले नाही. त्यात अनेक अडचणी आल्या. महाराष्ट्राचा विचार करता २०२४-२५ या हंगामात ५६२ खरेदी केंद्रांमार्फत 11,21,385 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे. मात्र निर्धारित खरेदीचे लक्ष सुमारे १४ लाख मे. टन होते. तसेच देशातही ही हमीभाव खरेदी कमीच होती. यंदा हमीभाव प्रति क्विंटल ४८९२ रुपये इतका आहे. मात्र तो अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

या आठवड्यात कमी झालेली आवक आणि बाजारातील कमी उपलब्धता यामुळे शेंगदाणा तेल, तेलबिया आणि कापूस तेलाचे भाव अनुक्रमे पूर्वीच्या पातळीवर राहिले असले तरी नाफेडच्या सोयाबीन विक्रीच्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊन एकूणच बाजारभाव ढासळल्याचे व्यापारातील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान नाफेडच्या या विक्रीचा सोयाबीनच्या पुढील पेऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण यावेळी उत्पादन वाढूनही, शेतकऱ्यांचे सोयाबीन किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) कमी दराने विकले गेले आणि जात आहे. आगामी पेरणीच्या हंगामापूर्वी नाफेडने सोयाबीन विक्री का केली? असा प्रश्न आता विचारला जात आहे. खरे तर हमीभावाने सोयाबीन खरेदी केले असेल तर त्याचा साठा करून बाजारपेठ निर्माण करण्याकडे लक्ष द्यायला हवे होते. मात्र एकूणच बाजार त्यामुळे आणखी कोसळणार असून त्याचा परिणाम भविष्यातील सोयाबीन पेऱ्यावर होण्याची शक्यता आहे.

यंदा देशातील बहुतांश तेलबिया पिकांचे उत्पादन कमी असल्याचे सांगितले जातेय. खाद्यतेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 55 टक्के आयातीवर अवलंबून असलेल्या देशात, देशातील शेतकऱ्यांची तेलबिया पिके एमएसपीपेक्षा खूपच कमी दराने विकली जाणे हे विरोधाभासी लक्षण असून त्यातून तेलाच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण कसा होणार असा सवाल आता शेतकरी करत आहेत.

Leave a Reply