
त्यानुसार यंदा संपूर्ण देशात एकूण रब्बीची लागवड दिनांक २४ फेब्रुवारीपर्यंत १०.२६ लाख हेक्टर झाली आहे. देशाची पाच वर्षांची सरासरी ही सुद्धा १०.२६ लाख हेक्टर असून यंदा सरासरी इतकी कांदा लागवड झालेली आहे. मागच्या वर्षी रब्बीची कांदा लागवड देशात १० लाख ८७ हजार हेक्टर इतकी होती. त्यातुलनेत यंदा सुमारे ६० हजार हेक्टरवर कमी कांदा लागवड झालेली दिसून येत आहे. देशातील रब्बी लागवडीची मागील पाच वर्षाची सरासरी आहे, १०.२६ लाख हेक्टर. म्हणजेच यंदा ही लागवड सरासरी इतकी झालेली दिसून येत आहे.
राज्याची लागवड ही देशाच्या तुलनेत साधारण ५० ते ६० टक्के असते. यंदा कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रब्बी कांद्याची लागवड ही ५ लाख ४१ हजार ३४१ हेक्टर आहे. मागच्या वर्षी ही लागवड होती ४ लाख ६४ हजार ८८४ हेक्टर इतकी होती. स्वाभाविकच मागच्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या लागवडीत यंदा १४ ते १५ टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी देशाची एकूण लागवड मागच्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे.
या आठवड्यात कसे आहेत दर
बुधवार ५ मार्च पर्यंत मागच्या आठवड्याच्या तुलनेत कांदा आवक थोडीशी वाढू लागलेली आहे. लासलगावला बुधवारी बाजारभाव लाल कांद्यासाठी २२७० रुपये प्रति क्विंटल, उन्हाळी कांद्यासाठी होते २३५० रुपये प्रति क्विंटल तर नागपूरला पांढऱ्या कांद्यासाठी बाजारभाव होते सरासरी २२३८ रुपये. दरम्यान सोमवारी ३ लाख १२ हजार क्विंटल, मंगळवारी २ लाख ९० हजार क्विंटल तर, बुधवारी २ लाख ३२ हजार क्विंटल कांद्याची आवक राज्यात झाली आहे.