सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यातील अनिल वसंतराव काटे यांची प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे. त्यांना वडिलोपार्जित जमीन 18 एकर असून, सातत्याने ते नवनवीन प्रयोग ते शेतीमध्ये करत असतात. ते दरवर्षी आठ ते दहा एकर मध्ये सोयाबीन चे पीक घेतात. बीज उत्पादनावर त्यांचा अधिक भर असतो.
रब्बीत हरभरा तसेच खपली गहू तर उर्वरित आठ एकरामध्ये आडसाली उसाची लागवड ते करत असतात. पूर्वी पारंपरिक व्यवस्थापनातून हाती फारसे काही लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून सुधारित व्यवस्थापनाचा अवलंब केला.
सुधारित पद्धतीची शेती
काटेकोर पाणी नियोजनासाठी सर्व पिकांना ठिबक सिंचन उपलब्ध.
दर्जेदार बियाणे तयार करण्यासाठी व्यवस्थापन करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
दरवर्षी आठ ते दहा एकर क्षेत्रामध्ये ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आघारकर संशोधन संस्था (पुणे) आदीकडील विविध वाणाची निवड केली जाते. मागील हंगामात केडीएस-९९२ (फुले दूर्वा), केडीएस-७५३ (फुले, किमया), आरव्हीएसएम -११३५, आरव्हीएसएम- १४६० व आरव्हीएसएम- १४०७ हे वाण घेतले होते.
लागवड पाच फुटी रुंद गादीवाफ्यावर (बेड) असते. या बेडवर तीन ओळी सोयाबीनच्या लावण्यात येतात. बेडच्या दोन्ही बाजूंना सऱ्या तयार होतात. टोकण करताना दोन झाडांतील अंतर ठिबक ड्रीपरच्या प्रत्येकी एक फुटांवरील छिद्रानुसार सुमारे नऊ इंच राखले जाते. टोकण पद्धतीत एकरी १३ ते १४ किलो, तर पेरणीसाठी १७ किलो बियाणे वापरण्यात येते.
बियाणे बचत व त्यावरील खर्चात मोठी बचत.
बेड व बाजूला दोन सऱ्या या पद्धतीमुळे शेतात फिरण्यासाठी तसेच तन नाशक व कीटकनाशक फवारणीसाठी मोकळी व हवेशीर जागा उपलब्ध.
वेळोवेळी पिकांची निरीक्षण केले. यामुळे फवारणी वेळेत झाली पीक वाढीच्या अवस्थेत१९-१९- १९, १२- ६१- ० व १३- ०- ४५ या विद्राव्य खतांचा वापर केला.
सूर्यप्रकाश भरपूर व योग्य प्रमाणात मिळाल्याने पिकांची वाढ एकसारखी झाली.
फुटवे चांगलेच आले फूलधारणा चांगली होऊन शेंगांचेही प्रमाण चांगले आले.
ठिबक द्वारे ओलित केल्यामुळे पावसाळ्यात खंड पडला तरी पाणी देता आले. पाऊस जास्त पडला तर अतिरिक्त पाणी हे सरीमध्ये जमा होते, व त्याचा निचरा करता येतो. त्यामुळे पिकाची नुकसान टाळता येते.
पिकाला पाण्याचा ताण बसला नाही.
शेतात वापसा स्थिती राखता आली. प्रकाशाची किरणे जमिनीपर्यंत पोचल्यामुळे तसेच आद्रता योग्य प्रमाणात राखली गेल्यामुळे किडी रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी राहिला.
उत्पादन व बियाणे विक्री
काटे यांना सुधारित लागवड पद्धती मधून 13 ते 17 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळते.
एका एकरामध्ये 17 किलो बियाण्यांचा वापर व प्रती किलो 120 रुपये दर गृहीत धरल्यास हा खर्च 2040 रुपये येतो .तर जुन्या पद्धतीत एकरी 30 किलो बियाणे वापरल्यास हा खर्च 3600 येत होता. म्हणजे सुधारित पद्धतीने पंधराशे साठ रुपयांची बचत होते.
तसेच यांच्याकडील बियाणे इतर शेतकरी घेऊन जातात. त्याचप्रमाणे स्थानिक माळेगाव येथील साखर कारखान्याला बियाणे देण्यात येते. किलोला 90 ते 120 रुपये दर मिळतो.
अन्य शेतीत प्रावीण्य
सोयाबीन सोबतच त्यांनी हरभरा पिकाच्या बीज उत्पादनातही कौशल्य मिळवले आहे. मागील वर्षी त्यांनी चार टन हरभरा बियाणे गुजरात मध्ये एका कंपनीला विकले आहे.
आडसाली उसाची शेतीला जोड असून एकरी त्यांना यामधून 75 ते 80 टन उत्पादन मिळते. यावर्षी त्यांनी पपईची देखील लागवड केली आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामती आगरकर इन्स्टिट्यूट यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते आई वडील पत्नी व मुलगा असा त्यांचा परिवार आहे व त्यांचा संपूर्ण परिवार हा शेतीवर अवलंबून आहे.