गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत परभणीतील 23 तलावा मधील दोन लाख 95 हजार 299 घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 509 शेतकऱ्यांच्या 700 एकर क्षेत्रावर गाळ पसरविण्यात आला आहे.
जलसंधारण विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी 3 कोटी 35 लाख रुपयांची निधीची मागणी करण्यात आली आहे. ही योजना परत सुरु करण्यात आलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग सार्वजनिक व खाजगी भागीदारी नवीन तंत्रज्ञान यांचा वापर करून ही योजना राबवली जात आहे. गावातील तलावा मधील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर अशासकीय संस्था नियुक्त करण्यात येते. गाळ उपसण्यासाठी यंत्रसामग्री अंदाजे खर्च प्रति घनमीटर 1.30 व इंधनावरील प्रति लिटर खर्च ११० रुपये व शेत जमिनीवर पसरवण्यात आलेल्या गाळासाठी प्रति घनमीटर 35 रुपये 75 पैसे नुसार एकरी 15000 रुपयांच्या मर्यादेत म्हणजेच एका एकरामध्ये चारशे घनमीटर गाळाच्या मर्यादित अनुदान देण्यात येते.
या योजनेसाठी विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त, अल्पभूधारक ,अशांना प्रथम प्राधान्य देण्यात येते .यावर्षी परभणी जिल्ह्यातील ६६ जलसाठ्यातील गाळ उपसण्यासाठी अर्ज आले होते. एकूण 42 अर्जांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्यातून पाच लाख 26 हजार 450 घनमीटर गाळाचा उपसा करण्याचे प्रस्तावित होते. प्रत्यक्षात 23 जलसाठ्यातून दोन लाख 95 हजार 299 घनमीटर गाळाचा उपसा करून 509 शेतकऱ्यांच्या सातशे एकरावर पसरविण्यात आला आहे.
गाळाचा उपसा करण्यात आलेल्या तलावामध्ये भोगाव (ता. परभणी) येथील पाझर तलाव, चिंचोली काळे, जांब खुर्द, सावरगाव, देवगाव, वाडी, पोखर्णी तांडा, धमधम,नवहाती तांडा, चाराठाणा,भिलज, बेलुरा, करंजी, कोरवाडी (सर्वता. जिंतूर), नरसापूर, तांदुळवाडी (सर्व ता. सेलू),
फत्तू नाईक तांडा, घटांग्रा, बोथी, काड्याची वाडी, बोर्डा, वागदरी (सर्व ता. गंगाखेड), बनवस, आडगाव (सर्व ता. पालम) या तलावांचा समावेश आहे. वडाळी (ता.जिंतूर), निरवाडी, नांदगाव-देवगाव (ता. सेलू), डोंगरजवळा (ता. गंगाखेड) येथील तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.