Soyabean Bajarbhav : काल दिनांक २ डिसेंबर रोजी नाशिकच्या लासलगाव बाजारात एनसीसीएफने सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून पहिल्या दिवशी सुमारे दीडशे क्विंटल सोयाबीन खरेदी झाली. सध्या सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रुपये आहे. मात्र शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांकडे विक्री करण्यास उत्साह दाखविलेला नाही. तरीही राज्यात अनेक सोयाबीन हमीभाव केंद्र कार्यान्वित होताना दिसत आहेत.
दरम्यान मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४२४० प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ०.४ % वाढ झाली आहे.
सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर २२ टक्केनी घट झाली आहे, असे निरीक्षण स्मार्ट प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण कक्षाने नोंदविले आहे.
त्यांच्या साप्ताहिक आढाव्यानुसार मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी वाशीम बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४४२५/क्विंटल.) तर अमरावती बाजारात सरासरी किंमती रु.४०९३ प्रति क्विंटल होत्या. या आठवड्यात जर हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये शेतकरी सोयाबीन घेऊन येण्याचे प्रमाण वाढले, तर सोयाबीनचे बाजार वाढू शकतात असा जाणकारांचा अंदाज आहे.