Soybean bajarbhav : सोयाबीन बाजारभाव आणखी घसरणार? हमीभाव खरेदीची मुदत संपली…

Soybean bajarbhav : सोयाबीन हमीभावाने आतापर्यंत राज्यात सुमारे ४ लाख क्विंटलवर खरेदी झाली असून अजूनही अनेक शेतकरी सरकारी सोयाबीन खरेदीपासून वंचित आहेत. दुसरीकडे बारदानाचा प्रश्न निर्माण झाल्याने मागच्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यासह बहुतेक ठिकाणची हमीभाव खरेदी केंद्र बंद आहेत. अशात सरकारी हमीभाव खरेदीची मुदत रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी संपुष्टात आली आहे. परिणामी त्याचा बाजारभावावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारी हमीभाव खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत करावी असे आदेश ८ जानेवारी रोजी बैठक घेऊन पणनमंत्र्यांनी दिले होते. मात्र त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा चालू असून काल रविवारपर्यंत तरी अशी मुदतवाढ आली नसल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे संपूर्ण महिनाभर हमीभाव खरेदीतील घोळ सुरूच असून बारदाना उपलब्ध न होणे, रजिस्ट्रेशन नाकारणे, खरेदी करताना शेतकऱ्यांना त्रास देणे अशा बाबी सुरू आहेत. त्यामुळे सुमारे १२ लाख मे.टन खरेदीचे लक्ष्य असतानाही केवळ ४ लाख मे. टन खरेदी झाली आहे.

याचा एकत्रित परिणाम रोजच्या बाजारावर झाला असून मागील दोन महिन्यापासून बाजारभाव कमीच आहेत. मात्र आता जर सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत वाढून मिळाली, नाही, तर हाच सोयाबीन सरकारी हमीभाव केंद्रावर न जाता बाजारात येईल. त्यातून आवक वाढून बाजारात आलेल्या सोयाबीनला आणखी कमी बाजारभाव मिळू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान मागच्या आठवड्यात सोयाबीनला राज्यात सरासरी ४ हजार तर या रविवारी म्हणजेच दिनांक १२ जानेवारी रोजी लातूर बाजारात सरासरी ४१०५ रुपये, तर बुलढाणा येथे ४ हजार सरासरी प्रति क्विंटल दर होते. ते टिकून होते. मात्र हमीभाव केंद्र खरेदी बंद झाली, तर त्या घसरण होईल अशी शक्यता आहे.10:44 AM

 
 

Leave a Reply