Weather forecast : हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणीसाठी उचला पावले…


Weather forecast : राज्यातील अनेक भागात १४ ते १८ जून २०२५ या कालावधीत हवामान विभागाने हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः घाटमाथा आणि कोरडवाहू क्षेत्रांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून काही भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील कृषी हवामान विज्ञान केंद्राने दिलेल्या सल्ल्यानुसार, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी पुरेसा पाऊस (७५ ते १०० मिमी) झाल्याशिवाय लागवड करू नये, असे सांगण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात पावसाचा खंड असून केवळ २ दिवसांतच काहीशी नोंद झाली आहे. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा तयार झालेला नाही. पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहील. सकाळी सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९९ टक्के आणि दुपारी ७० ते ८६ टक्के राहणार आहे. यामुळे जमिनीत भिजलेपण असले तरी सततचा ओलावा नाही. तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, तर वाऱ्याचा वेग १७ ते १९ किलोमीटर प्रतितास असेल.

शेतकऱ्यांनी जागरूक राहून हवामान माहितीचे नियमित निरीक्षण करावे. ‘मेघदूत’ किंवा ‘किसान सुविधा’ अ‍ॅप्सचा वापर करून स्थानिक अंदाज मिळवावा. बियाणे खरेदी करताना नकली बियाण्यांपासून सावध राहावे. पेरणीयोग्य स्थिती येईपर्यंत शेतीची मशागत करून ठेवावी.

भाजीपाला उत्पादनासाठी कांदा, वांगी, मिरची, टोमॅटोसारख्या पिकांची रोपवाटिका तयार करावी. पेरणीपूर्वी बियाण्यावर बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी. यासोबतच पीक सल्ला, खतांचे योग्य नियोजन, तण नियंत्रण आणि माती परीक्षण करून कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे.