Sugar Crushing Season: सध्या ऊसाचा गाळप हंगाम सुरू असून त्यासाठी लाखो कामगारांचे स्थलांतर झाले आहे. विशेषत: बीडसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील 10 लाख ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शेजारील राज्यात कमीत कमी 6 महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात.
ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र अत्यंत मेहनत व जोखमीचे काम त्यांना करावे लागते. ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान अनेक अपघात, विजेचा शॉक, सर्पदंश, वाऱ्या-पावसाने नुकसान, रस्ते अपघात यांसारख्या शेकडो समस्यांना तोंड देताना ऊसतोड कामगारांचे अनेकदा जीव जातात, अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात व त्यांच्या कुटुंबाचा आधार नाहीसा होतो. त्यामुळे या ऊसतोड कामगारांना, वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या पशूंना स्वतंत्र अपघात विमा योजना असावी, व दुर्दैवाने मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत व उपचार अशा निरनिराळ्या तरतुदी असाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना लागू केली आहे.
ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा’ असे योजनेचे नाव आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम तसेच दीड ते दोन लाख बैलजोड्या त्याचबरोबर कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विम्याचे कवच शासकीय निर्णयानुसार लागू करण्यात आले आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च ‘स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा’च्या भांडवलातून करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार, मुकादम, कारखाना यांपैकी कुणावरही कसलाही आर्थिक भार राहणार नाही