झोपडीमध्ये राहून शेतात आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आईवडिलांना स्वतःच्या हाताने बांधलेला टुमदार बंगला भेट देणारा भाटघर धरणाच्या पंचक्रोशीला शेतकरीपुत्र प्रशांत रामचंद्र माने हा चर्चेचा विषय बनला आहे.
प्रशांत हे ३२ वर्षांचे असून त्यांची वाटचालदेखील प्रेरणादायी आहे. भाटघर जलाशयाच्या शेवटच्या भागातील भुतोंडे, वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना गावांमध्ये भात हेच मुख्य पीक आहे. त्यामुळे उदरनिर्वाह साठी शेती आणि मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही. त्यापैकीच एक रामचंद्र माने व ताराबाई माने हे शेतकरी दांपत्य आहे.
भुतोंडे गावामध्ये गायीगुरे पाळून आणि थोडी शेती व इतरांच्या शेतांमध्ये मजुरी करत प्रशांत व प्रवीण अशा दोन मुलांना माने दांपत्याने स्थानिक शाळेत शिकवले. यात अभ्यासात प्रशांत कायम आघाडीवर असायचा.प्रशांत हा शालेय जीवनापासून सतत धडपड करणारा होता ,शेतीत उदरनिर्वाह होणार नसल्यामुळे तो पुढे मुंबईला गेला.
‘‘प्रशांत मुंबईला गेले ते मुळातच पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी व व्यवसाय उभारणीचे स्वप्नं घेऊन. त्यांनी मित्राला सोबत घेऊन ‘इमिटेशन ज्वेलरी’चा व्यवसाय सुरू केला. यामध्ये शिक्षण राहून गेले होते. त्यामुळे त्यांनी २०१६ मध्ये दहावीला प्रवेश घेतला. रात्री शिक्षण, आणि दिवसभर ‘बिझनेस’ असे सतत सहा वर्षे सुरू होते.
त्यांनी वाणिज्य शाखेमधून पदवीधर शिक्षण पूर्ण केले . रवी सेफ्टी प्रॉडक्ट्स नावाने त्यांनी दुसऱ्या बाजूला छोटी कंपनी उघडली. व्यवसाय स्थिर होत असताना कोरोनाची साथ आली व सारे होत्याचे नव्हते झाले.ते परत आयुष्याची पुंजी घेऊन गावात आले ,’’ अशी जीवनकहाणी प्रशांत यांनी सांगितली .
मुंबईत सतत व्यस्त असलेल्या प्रशांतला कोरोना काळात गावात एकटेपण आले.नवे घर आईवडिलांना देण्याचे त्यांचे स्वप्नं होतेच. पण,कोरोनामध्ये लॉकडाउन च्या काळात हे ध्येय सोडता त्यांच्याकडे काहीच हाताशी नव्हते . स्थापत्य अभियांत्रिकीची पुस्तके वाचून व यू-ट्यूब च्या मदतीने काही मूळ गोष्टी समजून घेतल्या. त्यांनी स्वतःच हाताने बंगला बांधण्याचा निर्णय घेतला.
ते स्वतः गवंडी झाले . नको म्हणत असतानाही आईवडील बिगारी बनले. मग, ते सर्वजण सतत दोन वर्षे राबले . आता १३५० फुटांचा प्रशस्त बंगला बांधला आहे. बंगल्या साठी दहा लाख रुपये खर्च केले आहेत. बिम भरणे,कॉलम, स्लॅब, प्लॅस्टर अशी सारी कामे त्यांनी स्वतः केली. प्लंबिंग, फॅब्रिकेशन हे देखील त्यांनी केले. आता फरशी आणि रंगकामही करणार आहे,’’ असे प्रशांतयांनी सांगितले..
शेतकऱ्यांची मुलं सतत लढत असतात .
कोणत्याही शेतकरी आईवडिलांचे स्वप्नं असते की , आपल्या मुलाने टुमदार बंगला बांधावा, शेतकऱ्यांच्या मुलांनी जगभर भरारी घ्यावी. आपली शेती, गाव आणि आईवडिलांना कधीही मुलांनी विसरू नये, आम्ही दऱ्याखोऱ्यांतील शेतकऱ्यांची मुलं मुळात शेत असो की व्यवसाय सतत लढत असतो. त्यामुळे बंगला पूर्ण होताच ते पुन्हा गाव सोडून मुंबईला नव्याने दुसरा कोणता तरी बिझनेस करणार आहे. काय करायचे हे आणखीन ठरलेले नाही. परंतु लढत राहायचे आहे,’’ असा संकल्प प्रशांत यांनी बोलून दाखवला .