यावर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे . अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने आठ ते दहा लाख तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात तुरीचे दर 11 हजाराचा टप्पा घाटण्याची शक्यता व्यापारी व अभ्यासकांनी वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर विकण्याची घाई न केलेलीच बरी राहणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर सरकार सर्व शेतमालाचे दर कमी करत आहे परंतु तुरीचे दर कमी केलेले नाहीत, देशातील कमी उत्पादनाने आयातीवरील मर्यादेमुळे सरकारने हा निर्णय घेतला असून खुल्या बाजारात तूर खरेदीची तयारी केंद्र सरकार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु सरकार किती तूर खरेदी करणार याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही. केंद्रीय सहकार विभागाने यापूर्वी आठ ते दहा लाख टन खरेदीचे उद्दिष्ट आहे असे सांगितले होते. साहजिकच सरकार इतकी तूर खरेदी करेल, ,असा अंदाज व्यक्त केला जात आहे . जिल्ह्यातील बाजार समित्यांत सद्यस्थितीतच तुरीला कमाल 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत आहे.
तूर आयतीमुळे दर घटले..
तूर डाळीच्या वाढलेल्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने तूर आयात केली होती. त्यामुळे दरात नरमाई निर्माण झाली आणि डाळीचे दर प्रति किलो 130 रुपयांवर आल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे तूर उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बाजाराचा आढावा घेऊन नाफेड रोज भाव जाहीर करणार..
सरकार साठी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ बाजारभावाने तूर खरेदी करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास यंदा हमीभाव सात हजार रुपये असला तरी नाफेड कडून शेतकऱ्यांना बाजार भाव मिळणार असून खुल्या बाजाराचा आढावा घेऊन नाफेडकडून रोज त्यांचे भाव जाहीर करण्यात येणार आहेत . केंद्र सरकार खुल्या बाजारात तूर खरेदीसाठी सज्ज आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात तुरीचे दर 11000 रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठण्याची दाट शक्यता आहे. अशातच शेतकऱ्यांनी तूर विक्री थांबवणे योग्य ठरेल- प्रवीण साबू व्यापारी कारंजा












