
आज संपूर्ण महाराष्ट्र मान्सून ने काबीज केला असून सह्याद्री घाटमाथ्यावर हलक्याशा तीव्रतेने का होईना पण मान्सूनचा वावर जाणवू लागला आहे. त्यामुळे आजपासून रविवार दि. ३० जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . मात्र , महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या काहीशा खंडानंतर, मान्सूनचा पाऊस सुरु होणार असल्यामुळे पुन्हा त्याचे स्वरूप, पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखेही असू शकते.
विभागवार पावसाची तीव्रता अशी असु शकते?
मुंबईसह संपूर्ण कोकण :
मंगळवार, दि. १८ जूनपासून म्हणजे गेल्या पाच दिवसापासून मुंबई शहर,पालघर, रायगड, रत्नागिरी, उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे.मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा अजुनही कायम टिकून आहे. तर या आठवड्यामध्ये कोकण , मुंबई शहर, उपनगर या मधील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
विदर्भ :
गुरुवार दि.२० जून पासुन पावसाने मध्यम ते जोरदारपणे संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात हजेरी लावली आहे. आता मान्सून बंगालच्या उपसागरीय शाखेच्या सक्रियतेमुळे सुद्धा जूनच्या संपूर्ण आठवड्यात संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता ही कायम टिकून आहे.
मध्य महाराष्ट्र :
बंगालच्या उपसागरीय शाखा सक्रिय झाल्यामुळे मान्सून अरबी समुद्रीय शाखा काहीशी उर्जीतावस्थेत आली आहे.त्यामुळे साधारण एक किमी. उंचीचा सह्याद्री घाट चढून घाट माथ्यावर वावरताना मान्सून जाणवत आहे.
त्यामुळे आजपासुन जूनअखेर पर्यंतच्या संपूर्ण आठवड्यात मान्सून खान्देश, पुणे, सातारा, सांगली ,नाशिक, नगर ,कोल्हापूर ,सोलापूर अश्या १० जिल्ह्यात मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता जाणवत आहे .
हे सर्व जरी असले तरी,जून अखेरपर्यंतच्या आठवड्यात नगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अश्या चार जिल्ह्यांच्या काही भागामध्ये सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील उर्वरित भागाच्या तुलनेमध्ये पावसाचे प्रमाण काहीसे कमी असण्याची शक्यता जाणवते.
मराठवाडा :
बुधवार दि. २६ जूनपर्यंत मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांत केवळ मध्यम पावसाचीच शक्यता आहे. गुरुवार दि.२७ ते ३० जूनपर्यंत मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित ७ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. आजपासूनच वरील ७ पैकी लातूर , धाराशिव, अशा दोन जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात तर कदाचित जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
ह्या पावसाची पेरणी संबंधी उपयुक्तता काय असु शकते?
ह्या आठवड्यातील पावसाने पेर झालेल्या पिकांना जीवदान, तर नापेर ठिकाणी पेर होण्याची शक्यता मिळू शकते, असे वाटते.
अधिक चांगल्या पावसाची शक्यता कधी असु शकते?
शनिवार दि. २९ जून ते ६ जुलै दरम्यानच्या आठवड्यात भारत विषुववृत्तीय उपसागरीय क्षेत्रात, एमजेओ च्या सक्रियतेमुळे, कदाचित महाराष्ट्रात अधिक चांगल्या पावसाची शक्यता जाणवत आहे .
मान्सून पावसाला स्थिती पूरक
एकाच जागेवर खिळलेल्या बंगाल उपसागरीय मान्सूनी शाखेने ३१मे पासून आपली जागा सोडून काहीशी पुढे झेपावली आहे.राजस्थान व छत्तीसगड वर असलेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती व त्यांना जोडणारा हवेच्या कमी दाबाचा एक तर दुसरा राजस्थान ते ईशान्य अरबी समुद्र जोडणाऱ्या दोन आसामुळे मान्सून पावसाला स्थिती पूरक झाली आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी समोर, समुद्र सपाटीच्या पातळीत तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे मान्सूनी वारे अधिक बळकट होत आहे.